Home रत्नागिरी धर्म हा भारतीय संस्कृती, समाजाचा कणा- डॉ. मधुसूदन पेन्ना

धर्म हा भारतीय संस्कृती, समाजाचा कणा- डॉ. मधुसूदन पेन्ना

55
0

आशाताई बच्छाव

IMG-20220817-WA0054.jpg

धर्म हा भारतीय संस्कृती, समाजाचा कणा- डॉ. मधुसूदन पेन्ना

रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) – धर्म ही संकल्पनाच विलक्षण आहे. धर्म हा समाजाचा कणा आहे. त्यावरच संस्कृती अवलंबून आहे. आपण धर्म आणि अधर्म जाणतो. भारतीय संस्कृती धर्माच्या आधारावर टिकून आहे. आपल्याकडे अनेक ऋषि होऊन गेले, त्यांचे कार्य आपल्यासमोर आहे. भारतात धर्म टिकून आहे. संस्कृत ही मृत भाषा नाही, आयुर्वेद, खगोलशास्त्र, विधी, विज्ञान या सर्वांमध्ये संस्कृत भाषेतील ग्रंथांचाच आधार घेतला जातो, असे प्रतिपादन कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरु डॉ. मधुसूदन पेन्ना यांनी केले.

गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहामध्ये कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक व भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र उपकेंद्र, सिद्धांत नॉलेज फाउंडेशन (चेन्नई) आणि संस्कृत संवर्धन व संशोधन प्रतिष्ठान (मुंबई) आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘धर्म, धर्मशास्त्र आणि संस्कृती’ या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेची सांगता उद्या १८ ऑगस्टला होणार आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेत भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे यांनी न्यायव्यवस्थेबद्दल मांडलेल्या विचारांबद्दल आणि ते मूळचे रत्नागिरी येथीलच असल्यामुळे ही संपूर्ण परिषद त्यांना समर्पित करण्यात आली.

महाराष्ट्रातील एकमेव कवी कुलगुरु कालिदास विश्वविद्यालयाचा रौप्य महोत्सव सुरू आहे. विद्यापीठ ए प्लस मानांकनासह नॅक ॲक्रिडेटेड आहे. विद्यापीठाने ११० पुस्तके, ग्रंथ प्रकाशित केले आहेत, अशी माहिती डॉ. पेन्ना यांनी दिली.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. मधुसूदन पेन्ना, वाईच्या प्राज्ञ पाठशाळा मंडळाच्या अध्यक्ष व प्रमुख अतिथी प्रा. सरोजा भाटे, के. जे. सोमय्या भारतीय संस्कृती पीठ्मच्या संचालक डॉ. कला आचार्य, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे निबंधक डॉ. रामचंद्र जोशी, संस्कृत संवर्धन व संशोधन प्रतिष्ठानचे सचिव आदिनाथ पाटील, इटलीतून आलेले आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रख्यात मानसशास्त्र विश्लेषक प्रा. पावलो बरोन, गो. जो. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, संस्कृत विभाग प्रमुख डॉ. कल्पना आठल्ये व कवी कुलगुरू कालिदास विश्वविद्यालयाचे रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, वैदिक मंगलाचरणाने, विद्यापीठ गीत, स्वागत गीत तसेच भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता म्हणून शासकीय नियमानुसार राष्ट्रगीत म्हणून करण्यात आली. परिषदेमध्ये इटली, अर्जेंटिना, लंडन, नेपाळ, श्रीलंका या देशांसह केरळ, दिल्ली, गुजरात आणि महाराष्ट्रातील तज्ञ मंडळी सहभागी झाले आहेत. कार्यक्रमामध्ये ‘शोधरत्नम्’ ‘धर्मकोष’ या पुस्तकाचा आठवा खंड व न्यायव्यवस्था व मीमांसा दर्शन या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

याप्रसंगी वाईच्या प्राज्ञ पाठशाळा मंडळाच्या अध्यक्ष व प्रमुख अतिथी प्रा. सरोजा भाटे यांनी सांगितले की, धर्म ही संकल्पना महामहोपाध्याय डॉ. पां. वा. काणे यांनी हजारो पाने लिहून समजावून सांगितली आहे. ते संस्कृत पंडित व राष्ट्रपुरुष व धर्मऋषि होते. धर्माच्या माध्यमातून सामाजिक न्यायासाठी त्यांनी योगदान दिले. भारतात विविध जाती, धर्मामध्ये वेगवेगळ्या प्रथापरंपरा आहे. १९२७ मध्ये पुण्यातील एका घटनेतून डॉ. काणे यांनी अस्पृश्यता हद्दपार करण्याचा उदाहरण घालून दिले. धर्म ही व्यापक संकल्पना आहे. डॉ. काणे यांच्या धर्म, न्यायविषयक विचारांना ही परिषद समर्पित आहे. आजच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचा उपयोग समाजासाठी व्हावा.

प्रास्ताविकामध्ये डॉ. दिनकर मराठे म्हणाले की, धर्मशास्त्राचा इतिहास लिहिण्याचे भारतरत्न डॉ. पां. वा. काणे यांचे काम विश्वविख्यात आहे. त्यांच्या नावानेच विश्वविद्यालयाने रत्नागिरीत उपकेंद्र सुरू केले आहे. आज प्रथमच रत्नागिरीत आंतरराष्ट्रीय परिषद भरवताना आनंद होत आहे. या परिषदेकरिता गोगटे कॉलेज, सिद्धांत नॉलेज फाउंडेशन, संस्कृती संवर्धन आणि संशोधन प्रतिष्ठान (मुंबई) यांचे बहुमोल सहकार्य लाभले आहे. परिषदेत भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे यांनी धर्म, न्यायव्यवस्थेबद्दल मांडलेल्या विचारांबद्दल आणि ते मूळचे रत्नागिरी येथीलच असल्यामुळे ही संपूर्ण परिषद त्यांना समर्पित करण्यात आली.

प्राचार्य डॉ. कुलकर्णी म्हणाले की, गोगटे-जोगळेकर कॉलेज हे कोकणातील अग्रणी असून नॅकचे अव्वल मानांकन, आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त आहे. महाविद्यालयाचा संस्कृत विभाग उपक्रम राबवत असतो. आज आंतरराष्ट्रीय परिषद हा मैलाचा दगड ठरणार आहे. आधुनिक काळामध्ये निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपल्याला धर्म, धर्मशास्त्र व आपल्या संस्कृतीमध्ये मिळू शकतात. या कार्यक्रमात आदिनाथ पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. या परिषदेमध्ये इटली, अर्जेंटिना, लंडन, नेपाळ, श्रीलंका या देशांसह केरळ, दिल्ली, गुजरात आणि महाराष्ट्रातील तज्ञ मंडळी सहभागी झाले आहेत. सूत्रसंचालन आशिष आठवले, श्रीवरदा माळगे यांनी केले. डॉ. कल्पना आठल्ये यांनी आभार मानले. परिषदेची सांगता उद्या होणार आहे. या कार्यक्रमाला अर्थसहाय्य फिनोलेक्स ग्रुप व नवलाई ग्रुप यांनी केले आहे. सूत्रसंचालन आशिष आठवले व श्रीवरदा माळगे यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. कल्पना आठल्ये यांनी केले.
तीन पुस्तकांचे प्रकाशन
कार्यक्रमात कै. डॉ. काणे यांच्या इंग्रजी न्याय व्यवस्था आणि मिमांसादर्शन या मराठी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पु. बा. साठे यांनी अनुवाद केला असून उदय कुमठेकर यांनी संपादन केले आहे. तसेच वाईच्या प्राज्ञ पाठशाळा निर्मित धर्म शास्त्राच्या कोश (५) ८ व्या भागाचे प्रकाशन केले. शोधरत्नम या पुस्तकाचेही प्रकाशन याप्रसंगी करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here