Home मुंबई ठाणे महानगर पालिका आपल्या दारी : ‘हर घर दस्तक’ योजना जोमात सुरू

ठाणे महानगर पालिका आपल्या दारी : ‘हर घर दस्तक’ योजना जोमात सुरू

78
0

राजेंद्र पाटील राऊत

ठाणे महानगर पालिका आपल्या दारी : ‘हर घर दस्तक’ योजना जोमात सुरू

ठाणे (अंकुश पवार, सहसंपादक,ठाणे/युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर)

ठाण्यातील सर्व नागरिकांचे लसीच्या पहिल्या डोसचे 30 नोव्हेंबरपर्यत 100 टक्के लसीकरण व्हावे यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून 9 नोव्हेंबरपासून सुरू केलेल्या ‘हर घर दस्तक’ या मोहिमेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आज या मोहिमेत स्वत: महापौर नरेश म्हस्के यांनी सहभाग घेऊन नागरिकांच्या घरी जाऊन चौकशी केली. यावेळी ज्यांचे लसीकरण झाले नाही अशा नागरिकांनी लस घेऊन महापौरांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.

कोपरी येथील काणेवाडी परिसर, गांधीनगर, लेप्रसी कॉलनी या परिसरात घरोघरी भेटी देवून महापौर नरेश म्हस्के यांनी नागरिकांशी संवाद साधला. ठाण्याचे प्रथम नागरिक आपली चौकशी करत आहेत ही आपुलकीची भावना यावेळी अनेक नागरिकांनी बोलून दाखविली. यावेळी डॉ. समिधा गोरे व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. कोविड 19 लसीकरणास सुरूवात झाल्यापासून ठाणे शहरातील विविध आरोग्यकेंद्र, जम्बो लसीकरण सेंटर, लसीकरण ऑन व्हील आदी विविध माध्यमातून लसीकरणाची मोहिम नियमित सुरू आहे. तरी देखील अनेक नागरिकांचे लसीकरण झाले नाही ही बाब लक्षात घेवून ठाणे महापालिकेच्या माध्यमातून 9 नोव्हेंबरपासून ठाणे शहरात महापौर नरेश म्हस्के यांच्या पुढाकाराने व आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली 9 नोव्हेंबरपासून व्यापक मोहिम सुरू करण्यात आली. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी सुमारे 14 हजार 752 जणांचे “ऑन द स्पॉट” लसीकरण करण्यात आले. ही मोहिम 30 नोव्हेंबरपर्यत सुरू राहणार आहे.

फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करीत असलेले कर्मचारी, महापालिका कर्मचारी यांना देखील लसीकरणाचे प्रमाणपत्र महापालिकेस सादर करावे लागणार आहे, अन्यथा त्यांचे वेतन अदा केले जाणार नाही असे आदेश महापौरांनी प्रशासनास दिल्यावर ज्या कर्मचाऱ्यांनी अद्याप लस घेतली नाही ते कर्मचारी देखील लसीकरण करुन घेण्यास पुढाकार घेत आहेत.

या मोहिमेसाठी 170 विशेष पथके तयार करण्यात आली असून प्रत्येक पथकात आशा वर्कर, सिस्टर तसेच वॉर्डबॉयचा समावेश आहे. डॉ. प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व पथके दिवा, कळवा, शीळ, कोपरी, मुंब्रा, कौसा, आतकोनेश्वर नगर, खारेगांव, नौपाडा, वागळे इस्टेट भागात कार्यरत आहेत. दर दिवशी 130 ते 150 घरांना ही पथके भेटी देणार आहेत, या माध्यमातून लसीकरण करुन घेणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे असे महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले. पहिल्याच दिवशी 14 हजार 752 नागरिकांचे लसीकरण झाले असून दर दिवशी अंदाजे 15 हजारांपर्यत लसीकरण होईल असा विश्वास देखील महापौरांनी व्यक्त केला आहे.

ठाणे शहरातील कोरोनाची संख्या ही जरी कमी होत असली तरी धोका पूर्णपणे टळलेला नाही. कोरोना समूळ नष्ट करण्यासाठी सद्य:स्थ‍ितीत लस हाच एकमेव पर्याय असून ठाणेकरांनी महापालिका राबवित असलेल्या या मोहिमेस प्रतिसाद देवून लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहनही महापौर नरेश म्हस्के यांनी ठाणेकरांना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here