Home उतर महाराष्ट्र जेष्ठ तमाशा कलावंत व वग सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे आज दु:खद निधन...

जेष्ठ तमाशा कलावंत व वग सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे आज दु:खद निधन झाले.

155
0

राजेंद्र पाटील राऊत

 

जेष्ठ तमाशा कलावंत व वग सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे आज दु:खद निधन झाले.
अहमदनगर,( ब्युरो टीम युवा मराठा न्युज नेटवर्क) कांताबाई सातारकर यांचे नुकतेच अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे निधन झाले.
जन्म. १५ ऑक्टोबर १९३९ गुजरातमधील बडोदा जिल्ह्यातल्या टिंबा या छोट्याशा गावी
कांताबाई सातारकर या प्रसिद्ध तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या मातोश्री होत. दगडखाणीत काम करणाऱ्या साहेबराव व चंद्राबाई या दांपत्याच्यापोटी कांताबाईंचा जन्म झाला. त्यांच्या कुटुंबात तमाशा नव्हता. तसेच तमाशाशी कुणाचा संबंधही नव्हता. त्यांचे वडील गुजरातमधून मूळगावी साताऱ्याला आले. तेव्हा कांताबाई बालपणी मैत्रीणींसोबत नृत्य करायच्या. साताऱ्यातील विविध मेळ्यातील नृत्याची त्या नक्कल करायच्या. त्यातूनच त्यांचा नृत्य आणि तमाशाकडे कल वाढला. पुढे साताऱ्यातील सर्जेराव अहिरवाडीकर यांच्या तमाशात त्यांनी काम सुरू केलं. बघता बघता कांताबाई सातारकर हे नाव गाजू लागलं.
कांताबाईंनी पुण्या-मुंबईतही तमाशाचे खेळ केले. वयाच्या अकराव्या वर्षी अहिरवाडीकर यांच्या तमाशाच्या माध्यमातून तमाशा रंगभूमीवर पदार्पण, यानंतर वगसम्राट बाबुराव पुणेकर यांच्या तमाशात काम करीत या क्षेत्रातील त्यांनी असंख्य बारकावे अभ्यासले. पण आयुष्यात जे काही करायचे ते भव्यदिव्य करायचे हे स्वप्न घेऊन १९५३ च्या सुमारास एकटीने मुंबई गाठली. पण फक्त एक दिवस दादू इंदुरीकर यांच्या तमाशात काम करून नंतर दुसऱ्याच दिवशी तुकाराम खेडकर यांच्या तमाशात काम करायला सुरुवात केली. इथूनच त्यांच्या कलाजीवनाला कलाटणी मिळाली. कांताबाई आणि खेडकर या जोडीने रायगडाची राणी अर्थात पन्हाळगडचा नजरकैदी, पाच तोफांची सलामी, महारथी कर्ण, हरिश्चंद्र तारामती, जय विजय, गवळ्याची रंभा आदी धार्मिक, सामाजिक वगनाट्यात काम केलं. तमाशात गाजलेली ही जोडी पुढे आयुष्यताही एक झाली. त्यांनी तुकाराम खेडकर यांच्याशी विवाह केला. पुढे त्यांना अनिता, अलका, रघुवीर व मंदाराणी अशी चार अपत्ये झाली. मुंबईतला गिरणी कामगार तर या जोडीचा अभिनय बघण्यासाठी पुन्हा पुन्हा हनुमान थियेटरला जायचा.
१९६४ मध्ये त्यांच्यावर मोठा आघात झाला. येवला तालुक्यातील एका गावात तमाशा सुरू असताना अचानक तुकाराम खेडकर यांची तब्येत बिघडली. त्यामुळे उपचारासाठी पुण्याला नेत असताना खेडकरांचे निधन झाले. पती गेल्यानंतर त्या एकट्या पडल्या. त्यांचं नशीब फिरलं. एवढेच नव्हे तर त्यांना पतीच्याच तमाशातून बाहेर पडावे लागले होते. दोन वर्षापूर्वी तब्बल ७० वर्षे तमाशा कला क्षेत्रात मोठं योगदान दिल्याबद्दल त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. संगमनेरमधील एका भव्य कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. या कार्यक्रमाला अनेक बडे नेते उपस्थित होते.
तमाशा क्षेत्रातील योगदानासाठी राज्य सरकारने २००५ मध्ये त्यांना पहिला ‘विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार’ देऊन गौरवलं होतं. दिल्लीतील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाप्रसंगी कांताबाई आणि रघुवीर यांना तमाशा सदर करण्याचा बहुमान मिळाला आहे. मुंबई विद्यापीठाच्या आवारात तंबू टाकून सिने, नाट्यसृष्टीतील मान्यवरांसाठी तमाशा सादर करण्याचा पहिला बहुमानही त्यांना मिळाला होता. कांताबाईंच्या तमाशाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे संपूर्ण कुटुंब आजही एकत्र राहून तमाशा रंगभूमीची सेवा करीत आहे. त्यांचे चिरंजीव कलाभूषण रघुवीर खेडकर, मुली अनिता, अलका, मंदाराणी, नातू मोहित व अभिजित, नातसून अमृता, नात पूजा, जावई दीपकराव मेंगजी, गोतान्बर सौन्दाडेकर, राजेश खोल्लम असा संपूर्ण परिवार तमाशा रंगभूमीवर कार्यरत आहे. संतोष खेडलेकर यांनी कांताबाई सातारकर यांचे ‘वगसम्राज्ञी कांताबाई सातारकर’ या नावाने चरित्र लिहिले आहे.
कांताबाई सातारकर यांची गाजलेली वगनाट्य.
रायगडची राणी, गवळ्याची रंभा, गोविंदा गोपाळा,१८५७ चा दरोडा, तडा गेलेला घडा, अधुरे माझे स्वप्न राहिले, कलंकिता मी धन्य झाले, असे पुढारी आमचे वैरी, डोम्या नाग अर्थात सख्खा भाऊ पक्का वैरी, कोंढाण्यावर स्वारी, पाच तोफांची सलामी, महारथी कर्ण, हरिश्चंद्र तारामती, जय विजय.
कांताबाई सातारकर यांना युवा मराठा न्युजची भावपूर्ण श्रद्धांजली.

Previous articleपरस्पर विरोधी तक्रारी वरुन ६ जणांवर गुन्हे दाखल ,  वाशिम जिल्ह्यातील वडप येथील घटना
Next articleगाळयुक्त शिवार गाळमुक्त तलाव मोहीमेस माकणी येथे तहसिलदार श्री काशिनाथ पाटील यांच्या शुभहस्ते सुरुवात.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here