राजेंद्र पाटील राऊत
“मानसिक तणाव”…कशाला म्हणतात जरा समजून घ्या
✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️) (वर्धापन दिन विशेष लेख)
जगात असा कुठलाच व्यक्ती नाही की,त्याच्या जीवनात मानसिक तणाव किंवा टेन्शन नाही..मग ते घरातील असो वा बाहेरचे..अशा परीस्थित काय करायला पाहिजे आणि काय करायला नको..ते जरा लक्ष पूर्वक समजून घ्या.
“मानसिक तणाव”यालाच आपण “डिप्रेशन” म्हणतो.”माणसिक तणाव” ही समस्या एवढी भयंकर समस्या असते की,जर कुठल्याही व्यक्तीं मध्ये “मानसिक तणाव” असेल तर त्याच्या आयुष्याचा शेवटचा दिवस कधी येईल,हे सांगता येणार नाही.”मानसिक तणावा”चे दुष्परिणाम खूपच घातक आहेत.याची आपणास जाणीव नाही.मानसिक तणाव अथवा डिप्रेशन हे प्रत्येक माणसाला असते.आणि त्यातून बाहेर आले नाही तर त्याचा दुष्परिणाम पण कधी तरी दिसतोच.सर्वात महत्वाचे म्हणजे “डिप्रेशन” वा मानसिक तणाव म्हणजे काय.?? तर मना मध्ये असंख्य गोष्टींचे काहुर माजलेले असताना आपल्या मना मधिल भावना व्यक्त न करता,त्या मना मध्येच दाबुन ठेवणे.म्हणजे मानसिक तणाव होय.माणूस आपल्याच मनातील भावना मनातल्या मनात का दाबुन ठेवतो..??तर आपले मत,आपल्या भावना आपले नातेवाईक,आपले आई वडील,आणि आपले मित्र समजून घेणार नाहीत आणि आपल्याला तिथे दोष देण्यात येईल.म्हणून अनेक भावना प्रत्येक व्यक्ती मनातल्या मनात दाबुन ठेवत असतो.भारतीय समाजा मध्ये खुप मोठे गैरसमज आहेत,खुप मोठे अज्ञान आहे.शिक्षीत लोक सुशिक्षित नाहीत,हीच खरी भारतीयांची समस्या आहे. भारता मध्ये कोणत्याही गोष्टी वर तेव्हाच चर्चा होते,जेव्हा काही तरी विपरीत घडते.प्रश्न असला की त्याचे उत्तर असतेच परंतु भारतीय समाजाची माणसिकता उत्तर शोधण्याची नसुन प्रश्नां भोवती घुटमळत राहण्याची आहे.थोडक्यात काय तर भारता मध्ये प्रश्नांवर, समस्येवर जास्त चर्चा होते उत्तर,उपाय किंवा इंग्लिश मध्ये “सोल्युशन”काढण्या वर चर्चा होत नाही.याला आपणच सर्व कारणीभुत आहोत.आपल्या वर झालेले संस्कार,आपण आपल्या मुलांवर करत असतो.बरेच पालक काळा नुसार आपल्या मध्ये बदल करत नाहीत.जे पालक काळा नुसार बदल करत नाहीत,त्यांच्या घरात शंभर टक्के कुठली न कुठली व्यक्ती डिप्रेशन मध्ये असतेच.मग ते मुलं असो वा पत्नी..पण त्यांना डिप्रेशनचा सामना करावाच लागतो.काही वेळेस डिप्रेशन दिसते,काही वेळेस छुप्या स्वरुपात असते.डिप्रेशन मध्ये असल्या वर जिवन संपवणे हा शेवटचा व टोकाचा निर्णय सर्व सामान्य मानसांना वाटला तरी जो डिप्रेशन मध्ये आहे,त्या व्यक्तीला सहज आणि सोपा मार्ग वाटतो.डिप्रेशन ची लक्षणे दिसु लागतात,पण आपण साधारण पणे ते दुर्लक्षित करतो.काही गोष्टी दुर्लक्षित केल्याने खुप विपरित परिणाम होऊ शकतात.जसे व्यक्ती नाराज राहत असेल,कमी बोलत असेल,जास्त बोलत असेल,मोठ्याने बोलत असेल पण त्या मध्ये कॉन्फिडन्स नसेल,जास्त लोकां मध्ये राहु वाटत नसेल,एकांत आवडत असेल,जास्त लोकां सोबतच राहण्याचा अट्टाहास करत असेल,दिवसभर मोबाईल किंवा टिव्ही समोर बसून बघत असेल,पण त्यात लक्ष नसेल, जेवन कमी किंवा अनियमित वेळेवर होत असेल,वारंवार एकाद्या गोष्टींची भीती वाटत असेल,काही गोष्टी बोलताना ओठावर आल्या तरी बोलण्याचे टाळत असेल तर आपण समजावे,तो व्यक्ती डिप्रेशन मध्ये आहे.आपल्या कुटुंबातील व्यक्तीला डिप्रेशन मध्ये जाण्या पासून आपणच वाचवू शकतो.पण आपल्या भारतीय समाजाची एक मानसिकता आहे.सर्दी,ताप, खोकला झाला की डॉक्टर कडे जायचं.गोळ्या औषधी घ्यायचा.मग आराम पडतो.पण आता वातावरण बदलेले आणि मला सर्दी खोकला ताप होऊ नाही म्हणून मी काय काळजी घ्यायला पाहिजे.या साठी डॉक्टर कडे कोणी फिरकत सुद्धा नाही.म्हणजे आपण काही गोष्टी फिक्स करून ठेवलेल्या असतात,वेळे नुसार आपण त्यामध्ये बदल करत नाही,पण तो आवश्यक असतो.
व्यक्ती माणसिक तणावा खाली कधी येतो किंवा डिप्रेशन मध्ये कधी जातो तर जवळच्या व्यक्तीने ठेवलेल्या अपेक्षा,आणि आपले वागणे यामध्ये तफावत असते.तेव्हा डिप्रेशन मध्ये जाण्याची शक्यता सर्वात जास्त असते.* *जवळचे म्हणजे सर्वात अगोदर आपल्याला परिवार आणि दुसरा वर्ग म्हणजे मित्र मंडळ.काही वेळेस पालक लोक सांगतात.त्या मित्रां सोबत राहु नको,त्यांना जास्त वेळ देऊ नको.तेव्हा कोणाचे न ऐकता एक व्यक्ती त्याच मित्रांना वेळ देतो आणि एखादा अनुचित प्रकार घडला तर तो कोणालाच सांगु शकत नाही.स्वतःच स्वतःला दोष देऊन अगोदर पालकांचे ऐकले असते तर बरं झाले असते.म्हणून तो विचार करत असतो.हिच पहिली पायरी आहे डिप्रेशन मध्ये जाण्याची.कारण आपण त्याला फक्त समस्या निर्माण होईल.हे सांगतो,समस्या निर्माण झाल्यास काय करायचं..हे कधिच सांगत नाही.म्हणून त्याला “सोल्युशन” मिळत नाही.पालकांनी आपल्या मुलांवर पारंपरिक संस्कार न करता,मुलांना काही गोष्टी शिकवण्या अगोदर बऱ्याच काही गोष्टी पालकांनी शिकणे आवश्यक आहे.मुलां सोबत कोणत्या गोष्टी बोलायच्या,कोणत्या बोलायच्या नाहीत,कोणत्या गोष्टी कोणत्या वेळी बोलायच्या..याचा अंदाज अगोदर पालकांनी घेणे गरजेचे आहे.पण आपण मुलां साठी चांगले घर,चांगली गाडी घेण्याचे स्वप्न बघून त्यावर खर्च करतो.परंतु मुलांना घडविन्या साठी स्वतः कधिच विचार करीत नाही.म्हणून पारंपरिक पद्धतीने आपण वागतो.परिणामत: बापाने कमावलेली संपती मुलगा गमावून टाकतो,किंवा संपतीचा व वैभवाचा त्याला उपभोग घेता येत नाही,जिवन संपवितो.एवढेच काय प्रसिद्धी मिळवलेले पैशाची कमतरता नसलेले लोक सुद्धा डिप्रेशन मध्ये असतात.मागे आपण अनेक बातम्या वाचल्या असतील,ऐकल्या असतील शासकीय उच्च पदा वरील अधिकारी यांनी स्वतःचे जिवन संपविले,पेशाने डॉक्टर असलेल्या व्यक्तीने जिवन संपविले,लोकांना अध्यात्म सांगणारे भय्युजी महाराज यांनी जिवन संपविले,नव्याने नावा रुपाला आलेला नायक सुशांतसिंह राजपूत यांनी जिवन संपविले,आणि “सोशल मिडीया” वर अनेक चाहता वर्ग निर्माण करणाऱ्या समिर गायकवाड यांनी आपल्या जिवनाला सुरवात करण्या पुर्वीच जिवन संपविले.याचा अर्थ पैसा,प्रसिद्धी,सुख सुविधा असल्या तरी व्यक्ती डिप्रेशन मध्ये जाऊ शकतो.आपला मुलगा मुलगी डिप्रेशन मध्ये जाऊ नाही.म्हणून आपण स्वतः “मोटीवेशनल प्रोग्राम अटेंड” करणे गरजेचे आहे.आणि आपल्या मुला मुलींना “मोटीवेशनल” व्यक्तीच्या संपर्कात ठेवणे गरजेचे आहे.आपण आपल्या मुलाला किती संपती कमवून ठेवतो,त्यापेक्षा त्याचे जिवन कसे सुखमय करून जातो.हे महत्त्वाचे आहे.आणि स्वतः कमालवेल्या पैशात सुख नाही तर सुख हे त्याच्या मनात असते.आणि हे सुख मनात निर्माण करण्या साठी पालकांनी महत्वाची भुमिका घेणे गरजेचे असते.
पालकांनी आपल्या मुलां मुलीं सोबत मित्रा सारखे रहावे.मित्रा सारखे वागायचे,म्हणजे मुला मुलींनी मागितले ते तात्काळ देणे नाही,मित्रा सारखे रहायचे म्हणजे त्यांच्या मना सारखे वागायचे नाही,पण त्यांच्या मताचा आदर नक्कीच करायचा.त्यांच्या मना सारखे रहायचे नाही म्हणजे प्रत्येक गोष्टीला विरोध करायचा नाही. मुला मुलीं साठी महागडा बेड घेण्या अगोदर त्याला शांत झोप कशी लागेल.याचा विचार करणे गरजेचे आहे.महागड्या हॉटेल मध्ये जाऊन खाण्या अगोदर त्याला भुक लागणे गरजेचे आहे.जर हेच होत नसेल तर मऊ मऊ बेड असुन त्याला त्याचा उपभोग घेता येणार नाही.म्हणजे तो डिप्रेशन मध्ये आहे.आपल्या कुटुंबातील लोकांना डिप्रेशन मधून बाहेर काढण्या साठी कुटुंबातील लोकांना सुखी आनंदी ठेवण्या साठी,आपण अगोदरच आपली मानसिकता बदलली पाहिजे.आपले शब्द खुप धारदार असतात.त्याचा वापर कसा करायचा.हे आपल्याला तेव्हाच कळेल जेव्हा आपण काही वेळ आपल्या परिवारातील लोकां साठी खर्च करू.संपुर्ण कुटुंबा सह सिनेमाला जाऊन हजारो रुपयांचा चुराडा केल्या पेक्षा अशा व्यक्तींच्या कार्यक्रमाला जा..जेथे जिवन जगण्याची कला व शक्ती मिळते.पालकांनी घरातील विलन म्हणून जिवन न जगता आपल्या परिवारा मध्ये मिळून जिवन जगले.तर ते कुटुंब यशस्वी होते.आपण आपल्या मुला मुलींचे असे मित्र बनले पाहिजे,की त्यांनी तुम्हाला प्रत्येक समस्या सांगुन तुम्हालाच उत्तर वा सोल्युशन मागितले पाहिजे.आणि हे तेव्हाच शक्य होईल,आपण काल्पनिक गोष्टी मधुन बाहेर येऊन सत्य बघू.डिप्रेशन मुळे प्रत्येक व्यक्ती जिवन संपविणार नाही.परंतु जिवनातील बऱ्याच गोष्टी संपवून तो मोकळा होतो.याची आपल्याला कल्पना देखील नसते.जसे स्वतः वरचा कॉन्फिडन्स,व्यक्ती वरिल विश्वास,ध्येय,सकारात्मक विचार हे सर्व गमावून फक्त दिवस उजाडतो.म्हणून जिवन जगायचे आणि भुक लागते म्हणून खायचे…एवढेच विचार डोक्यात येऊन विचार कक्षा आकुंचन पावतात,कार्यक्षमता कमी होते,आणि आपण कार्य क्षमता दाखवता वेळी मानसिक थकवा येतो.हेच ते डिप्रेशन.आपण व आपले सुरक्षित व मानसिक तणाव मुक्ती साठी आपण सल्ला घेऊ या,आपले कुटुंब आनंदी ठेऊ या.असा संकल्प करून आपण तो संकल्प पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपण होणारे विपरीत परिणाम टाळू शकतो
बांधवांनो मी काही मानसिक तज्ञ नाही किंवा डॉक्टर पण नाही. पण मला आलेल्या अनुभव नुसार मी थोडक्यात उपाय सुचविण्याचा छोटासा प्रयास जरूर केला.




