राजेंद्र पाटील राऊत
झाडांवर खिळे ठोकणे , जाहिरातींचे फलक लावणाऱ्यावर दंडात्मक कारवाई होणार
कोल्हापूर :
जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी खिळेमुक्त झाडांची मोहीम राज्यभर राबवण्याचा निर्णय हाती घेतला असुन त्याची अंमलबजावणी कोल्हापूर शहरातून सुरू करण्यात आली.
झाडांना इजा पोहोचविणे, त्याच्यावर खिळे ठोकणे अशा प्रकारचे कृत्य कायद्याने गुन्हा आहे. यापुढे झाडांवर खिळे ठोकणे तसेच जाहिरातींचे फलक लावणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिला आहे. दरम्यान, पर्यावरणाची होणारी हानी आणि येणाऱ्या काळात वृक्षसंपदेची गरज पाहाता, खिळेमुक्त झाडांची मोहीम राज्यभर हाती घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
‘झाडे लावा झाडे जगवा’ असा संदेश देताना, झाडांनासुद्धा संवेदना असल्याचा विसर पडल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी झाडांवर खिळे, जाहिरातींचे फलक, तारा, अँगल, लोखंडी ब्रॅकेट मारल्याचे दिसून येते.
यामुळे झाडांच्या वाढीवर विपरित परिणाम होतो.
ही बाब लक्षात घेऊन शहरात ‘खिळेमुक्त झाडांचं कोल्हापूर’ ही विशेष मोहीम राबविण्याची संकल्पना पालकमंत्री सतेज पाटील यांनी गेल्या आठवडय़ात शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांच्या समोर मांडली, तर आजपासून प्रत्यक्ष या मोहिमेला छत्रपती ताराराणी चौक, कावळा नाका येथून मोठय़ा उत्साहात सुरुवात झाली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव यांनी स्वतः या मोहिमेत सहभाग घेत, झाडांवरील फलक काढले. यावेळी हा उपक्रम सातत्याने पुढे सुरूच ठेऊ, असा निर्धार सहभागी स्वयंसेवी संस्थांनी केला. ‘एकच नारा एकच सूर, खिळेमुक्त कोल्हापूर’ अशा घोषणा देत यावेळी जनजागृतीदेखील करण्यात आली.
युवा मराठा न्यूज नेटवर्क .