🛑 माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना धक्काबुक्की; तिघांना अटक 🛑
✍️पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
पुणे :⭕ श्वानाला फेरफटका मारण्यासाठी घेऊन निघालेल्या ज्येष्ठ नागरिकाबरोबर वाद घालणार्या मद्यपी टोळक्याला जाब विचारणार्या कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या सुनेला टोळक्याने धमकावले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली.
अमर सयाजी बनसोडे (वय-26), विनोद सुरेश गेंदे (वय-26), रोहिदास उर्फ तेजस राजेंद्र कांबळे (वय-19, तिघे रा. गणंजय सोसायटी, कोथरूड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मिथून हरगुडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो पसार आहे.
याप्रकरणी एका महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपींविरोधात धमकावणे, मारहाण करणे तसेच विनयभंग अशा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारदार महिला एका खासगी कंपनीत मनुष्यबळ व्यवस्थापन विभागात अधिकारी आहे. त्यांचे सासरे शनिवारी (6 जून) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सहजानंद सोसायटीतील मोकळ्या रस्त्यावर पाळीव श्वानाला घेऊन निघाले होते. त्यावेळी आरोपी बनसोडे, गेंदे, कांबळे, हरगुडे मोकळ्या जागेत मद्यापान करत होते. तक्रारदार महिलेचे सासरे तेथून श्वानाला घेऊन जात असताना मद्याच्या नशेत असलेल्या आरोपींनी त्यांच्याबरोबर वाद घालण्यास सुरुवात केला.
श्वान आमच्या अंगावर सोडतो का? अशी विचारणा करून त्यांना काचेची बाटली, दगड फेकून मारला. त्यानंतर ते पळत सोसायटीच्या आवारात आले. तक्रारदार महिला आणि राहुल कोल्हे, विलास कोल्हे यांनी टोळक्याकडे विचारणा केली. तक्रारदार महिलेला आरोपींनी धक्काबुक्की केली. तेथून काही अंतरावर माजी आमदार मेधा कुलकर्णी यांचा बंगला आहे. रस्त्यावर सुरू असलेला आरडाओरडा ऐकून त्या तत्काळ तेथे गेल्या. अरेरावी करणार्या आरोपींना कोल्हे तसेच कुलकर्णी यांनी पकडले. झटापटीत कुलकर्णी यांच्या हाताची दोन बोटे फ्रॅक्चर झाली. त्यानंतर तक्रारदार महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके तपास करत आहेत.⭕