आशाताई बच्छाव
कळमदरे येथे अखंड हरिनाम सप्ताहाला उत्स्फूर्त प्रतिसाद; भागवत कथेने रंगली आध्यात्मिक मेजवानी
चांदवड (विभागीय संपादक – सुनील गांगुर्डे) : तालुक्यातील कळमदरे येथे गेल्या 26 वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहाला यंदा ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावर्षी पारंपरिक कीर्तन परंपरेऐवजी श्रीमद्भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. या सकारात्मक बदलाचे ग्रामस्थांनी स्वागत करत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
या धार्मिक सोहळ्यात कथाकार ह.भ.प. प्रभाकर महाराज शिंपी यांनी आपल्या ओघवत्या व प्रभावी वाणीमधून श्रीमद्भागवत कथेचे सुंदर विवेचन केले. त्यांच्या कथेमुळे उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले होते. अध्यात्म, संस्कार आणि जीवनमूल्यांचा संगम त्यांच्या प्रवचनातून अनुभवायला मिळाला.
या कार्यक्रमासाठी कळमदरे गावचे ह.भ.प. रमेश महाजन यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच गावातील भजनी मंडळ, ग्रामस्थ व भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत भागवत कथेचा आस्वाद घेतला.
आज हरिनाम सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी ह.भ.प. रमेश महाराज यांच्या उपस्थितीत काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर सप्ताहाची सांगता होणार आहे. यामुळे संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही हा धार्मिक उत्सव भक्तिभावाने व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत असून, कळमदरे गावातील हा हरिनाम सप्ताह परिसरातील श्रद्धाळूंसाठी आध्यात्मिक पर्वणी ठरत आहे.






