आदिवासीबहुल तालुक्यात महिन्यातून एकदा आर.टी.ओ. कॅम्प घ्यावा – पत्रकार संघाची मागणी
(युवा मराठा न्यूज)
सतीश जवंजाळ – प्रतिनिधी संग्रामपूर
संग्रामपूर तालुक्यात तातडीने आर.टी.ओ. कॅम्प सुरू करण्यात यावा, या मागणीसाठी मराठी पत्रकार परिषद, मुंबई संलग्नित तालुका पत्रकार संघ, संग्रामपूर यांच्या वतीने उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, खामगाव यांना निवेदन सादर करण्यात आले. सदर निवेदन तहसीलदार प्रशांत पाटील यांच्यामार्फत देण्यात आले.
संग्रामपूर तालुका हा आदिवासी व मागासवर्गीय बहुल असून, येथील वाहनधारकांना परवाना काढणे व नूतनीकरण, पी.यू.सी., जुन्या वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, वाहन विक्रीनंतर नावांतरण, वाहनावरील बोजा उतरवणे, मोबाईल नंबर अपडेट करणे, नवीन नंबर प्लेट आदी कामांसाठी खामगाव येथील आर.टी.ओ. कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. यामुळे वेळ व आर्थिक खर्च मोठ्या प्रमाणात होत असून, विशेषतः आदिवासी, गोरगरीब शेतकरी, मजूर व सामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. वेळेवर कामे न झाल्याने अनेक वाहनधारकांची कागदपत्रे प्रलंबित राहत असून, परिणामी दंडाच्या स्वरूपात आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांप्रमाणे संग्रामपूरसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल तालुक्यात किमान महिन्यातून एकदा तरी आर.टी.ओ. कॅम्पचे आयोजन करण्यात यावे, अशी कळकळीची मागणी पत्रकार संघाने केली आहे. पत्रकार दिनाच्या औचित्याने ही सामाजिक व जनहिताची मागणी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. यावेळी मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्नित संग्रामपूर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील दांदळे यांच्यासह पंजाबराव ठाकरे, रामेश्वर गायकी, अझहर अली, डॉ. संतोष लांडे, श्याम देशमुख, आकाश पालीवाल, सागर कापसे, राजेंद्र धर्माधिकारी, विवेक राऊत, गोपाल धर्माळ, शेख अब्दुल, भगवान पाखरे, मोहन सोनोने, रतन भगत, कासम सुरत्ने, भास्कर बोंद्रे, प्रल्हाद सावकार, निलेश तायडे, विजय हागे, विठ्ठल निंबोळकर, ज्ञानेश्वर अतकरे, मनोज अमनकार, सतीश जवंजाळ आदी पत्रकार उपस्थित होते. संग्रामपूर तालुक्यात आर.टी.ओ. कॅम्प सुरू झाल्यास हजारो वाहनधारकांचा वेळ, पैसा वाचून सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.





