Home गडचिरोली गडचिरोलीकरांनो सावधान!एक क्लिक आणि व्हॉट्सअ‍ॅप हायजॅक; RTO चालान लिंकचा गडचिरोलीत धुमाकूळ!

गडचिरोलीकरांनो सावधान!एक क्लिक आणि व्हॉट्सअ‍ॅप हायजॅक; RTO चालान लिंकचा गडचिरोलीत धुमाकूळ!

81

आशाताई बच्छाव

1002462514.jpg

गडचिरोलीकरांनो सावधान!एक क्लिक आणि व्हॉट्सअ‍ॅप हायजॅक; RTO चालान लिंकचा गडचिरोलीत धुमाकूळ!

नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर यांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

जिल्हा प्रतिनिधी: सुरज गुंडमवार

दि.07/01/2026

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात RTO चालान लिंकच्या नावाखाली पाठवण्यात येणाऱ्या बनावट लिंकवर क्लिक केल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे मोबाईल व व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक झाल्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत. या घटनांमुळे अनेक नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्याचा धोका वाढला असून सायबर गुन्हेगारांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.

सायबर गुन्हेगार नागरिकांच्या मोबाईलवर “तुमच्यावर RTO चालान प्रलंबित आहे”, “वाहन दंड भरा”, “तत्काळ लिंक ओपन करा” अशा आशयाचे मेसेज पाठवत आहेत. या लिंकवर क्लिक करताच संबंधित नागरिकाचा मोबाईल हॅक होऊन त्याच्याच व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावरून इतर नागरिकांना फसवणुकीचे मेसेज पाठवले जात आहेत. विशेष म्हणजे, गडचिरोलीत अनेक नागरिकांचे व्हॉट्सअ‍ॅप पूर्णपणे हायजॅक झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.

यामुळे ओळखीच्या व्यक्तीकडून आलेला मेसेज असला तरी त्यावर तात्काळ विश्वास न ठेवता खात्री करणे अत्यावश्यक झाले आहे. याच माध्यमातून पैशांची मागणी, बँक लिंक किंवा इतर संशयास्पद माहिती पाठवली जात असल्याचेही निदर्शनास आले आहे.

तसेच सायबर गुन्हेगार स्वतःला बँक कर्मचारी, पोलीस, आरटीओ अधिकारी किंवा सरकारी अधिकारी असल्याचे भासवून फोन करून नागरिकांकडून ओटीपी (OTP) मागत आहेत. मात्र कोणतीही बँक, आरटीओ किंवा शासकीय यंत्रणा कधीही फोनवरून ओटीपी मागत नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर यांचे नागरिकांना आवाहन

या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर यांनी गडचिरोलीतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.

त्या म्हणाल्या की, “RTO चालान किंवा कोणत्याही शासकीय नावाने येणाऱ्या संशयास्पद लिंकवर नागरिकांनी अजिबात क्लिक करू नये. कोणालाही पैसे पाठवण्यापूर्वी खात्री करावी. सायबर फसवणूक हा गंभीर गुन्हा असून, नागरिकांनी सावध राहणे हाच त्यावरील प्रभावी उपाय आहे.”

कोणालाही पैसे पाठवण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची प्रत्यक्ष किंवा फोनद्वारे खात्री करूनच व्यवहार करावेत, अन्यथा आर्थिक फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे.

पोलीस प्रशासन व सायबर विभागाकडूनही नागरिकांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, संशयास्पद कॉल, मेसेज किंवा कोणतीही लिंक आल्यास ती उघडू नये. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा सायबर गुन्हे विभागाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सावध रहा – सुरक्षित रहा!

RTO चालानसह कोणतीही संशयास्पद लिंक उघडू नका.
सायबर फसवणुकीपासून स्वतःचा व आपल्या कुटुंबाचा बचाव करा.