आशाताई बच्छाव
. “लब पे दुआएं… पण झोली खाली!” — आमदार डॉ. संजय कुटे यांचा अंतःकरणस्पर्शी स्वर
“झोली खाली…” — निष्ठावंत मनाची मौन वेदना, साईभजनाच्या स्वरांतून उमटलेली कथा
✍🏻स्वप्निल देशमुख
“लब पे दुआएं, आंखों में आंसू, दिल में उम्मीद… पर झोली खाली…”
हे भजन फक्त सूर नव्हते, ते एका अंतःकरणाचा आवाज होता.
हे शब्द उच्चारताना आमदार डॉ. संजय कुटे यांच्या डोळ्यांत उमटलेली ओल आणि आवाजातील कंप — प्रत्येक श्रोत्याच्या हृदयाला भिडला.
जळगाव (जा.) मतदारसंघाचे आमदार डॉ. कुटे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी, पक्षनिष्ठ आणि नेहमीच जनतेच्या कामात अग्रभागी राहणारे नेते म्हणून ओळखले जातात. परंतु, सत्तेच्या स्थापनेला वर्ष होत असतानाही त्यांना मंत्रिपद न मिळाल्याने कार्यकर्त्यांच्या मनात अस्वस्थता होती.
आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर — एका कार्यकर्त्याच्या घरी झालेल्या साईभजन कार्यक्रमात त्यांनी हे भजन गायले.
त्या क्षणी कुणालाही वाटलं नाही की हा फक्त भक्तीचा सूर आहे; तो होता मनातील न बोललेला संवाद, अधुर्या अपेक्षांचा शब्दरहित हळवा स्वर.
“लब पे दुआएं…” म्हणताना त्यांच्या डोळ्यांत साईवरील श्रद्धा होती, पण “झोली खाली” या शब्दांनी त्यांच्या अंतःकरणातील शांत वेदनेचा प्रत्यय दिला.
पाच वेळा सलग विजय, पक्षासाठी अखंड निष्ठा, आणि तरीही पदापासून दूर राहिलेलं एक कर्तृत्ववान मन — हाच तर त्या भावनेचा केंद्रबिंदू होता.
कार्यकर्त्यांमध्ये निराशेची कुजबुज असतानाही, डॉ. कुटे यांनी पुन्हा एकदा आपली शांत, संयमी वृत्ती दाखवली. त्यांनी म्हटलं होतं —
>“भाजप म्हणजे आपलं घर आहे. घरात कधी कधी मनाविरुद्ध निर्णय होतात, पण ते मोठ्या मनाने स्वीकारावे लागतात.”
हे वाक्य, आणि त्यानंतरचं ते भजन — दोन्हींच्या मधून झिरपणारी त्यांची निष्ठा, नम्रता आणि अपार संयम स्पष्ट जाणवत होता.
सत्तेच्या दालनात आज त्यांच्या झोलीत पद नाही, पण जनतेच्या हृदयात त्यांचं स्थान अजूनही तितकंच मोठं आहे.
अलीकडेच फडणवीसांनी स्वतः त्यांच्या घरी भेट देऊन स्नेहसंवाद साधला, तेव्हा या दोन निष्ठावंत सहकाऱ्यांमधील बंध अजूनही तुटलेले नाहीत, हे अधोरेखित झालं.
पण तरीही प्रश्न हवेत तरंगतो —
हे भजन केवळ साईभक्तीचं प्रतीक होतं का, की एका निष्ठावंत सेवकाच्या मनातील अपूर्णतेची व्यथा?
उत्तर कदाचित काळ देईल… पण आजसाठी एवढं नक्की —
“लब पे दुआएं…” म्हणताना ज्या मनातून स्वर निघाला, ते मन सत्तेपेक्षा सेवेला अधिक मोठं मानणारं आहे.






