आशाताई बच्छाव
निफाड तालुक्यात सरसकट पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा
निफाड तालुका शिवसेनेचे जिल्हाधिकारी पाटील यांच्याकडे मागणी
दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक रामभाऊ आवारे तालुका प्रतिनिधी
निफाड तालुक्यासह नाशिक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजा संकटात सापडला आहे. निफाड तालुक्यासह नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने सरसकट पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी नवनियुक्त अप्पर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांच्याकडे निफाड तालुका शिवसेनेच्यावतीने तालुकाप्रमुख खंडू बोडके पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात नवनियुक्त अप्पर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांची खंडू बोडके पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने भेट घेऊन निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची माहिती यावेळी शिष्टमंडळाने हेमांगी पाटील यांना दिली. नवनियुक्त अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांचा निफाड तालुका शिवसेनेच्यावतीने तालुकाप्रमुख खंडू बोडके पाटील, माजी सभापती शिवा पाटील सुराशे, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जगताप यांनी सत्कार केला. निफाड तालुक्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, मका, ऊस, भाजीपाला व इतर नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हातबल झाले आहे. शासनाने व प्रशासनाने अस्मानी सुलतानी संकटांनी घेरलेल्या बळीराजाला भरीव मदत देऊन हातभार लावावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांनी तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश निफाड तहसीलदारांना दिले. तसेच शासनाकडून मदत मिळवण्यासाठी पंचनामे झाल्यावर प्रस्ताव पाठवण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. यावेळी संपूर्ण नाशिक जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली. यावेळी हेमांगी पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख खंडू बोडके पाटील यांच्यासह उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जगताप, माजी सभापती शिवा पाटील सुराशे, कळवण तालुकाप्रमुख अंबादास जाधव, शेतकरी नेते रामराव मामा मोरे, सुरगाणा तालुकाप्रमुख मोहन गांगुर्डे, जयराम मोरे, सचिन मोरे आदी उपस्थित होते.
◾निफाड तालुक्यासह नाशिक जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांपासून अतिवृष्टी सुरू असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रशासनाने सरसकट पंचनामे करावे व शासनाने बळीराजाला तातडीने भरीव मदत करावी अन्यथा निफाड तालुका शिवसेना शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. निफाडसह संपूर्ण नाशिक जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना तातडीची मदत करावी.
खंडू बोडके पाटील (तालुकाप्रमुख शिवसेना)






