आशाताई बच्छाव
धनगर समाजाचा इशारा; दीपक बोहाडे यांचे उपोषण तात्काळ सोडवा – मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन
✍🏻स्वप्निल देशमुख
संग्रामपूर (प्रतिनिधी):
धनगर समाज महासंघ व मल्हारसेना ता. संग्रामपूर जि. बुलढाणा यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. धनगर समाजाच्या घटनादत्त एस.टी. आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करून उपोषणकर्ते श्री. दीपक बोहाडे (जालना) यांचे आमरण उपोषण तात्काळ सोडविण्याची मागणी यामध्ये करण्यात आली आहे.
सन २०१४ मध्ये बारामती येथे लाखो धनगर समाज बांधवांसमोर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सत्ता मिळाल्यावर पहिल्याच कॅबिनेट बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवू असा शब्द दिला होता. मात्र आजवर शेकडो कॅबिनेट बैठका पार पडूनही समाजाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
उपोषणकर्ते दीपक बोहाडे हे दिनांक १७ सप्टेंबरपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक, अंबड चौफुल्ली, जालना येथे आमरण उपोषणावर बसले आहेत. आज उपोषणाचा १३ वा दिवस असूनही शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. शासनाने तत्काळ ठोस निर्णय घ्यावा अन्यथा धनगर समाज बांधवांना तीव्र आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.
दीपक बोहाडे यांच्या उपोषणादरम्यान त्यांच्या जीवितास काही अनिष्ट घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारवर राहील, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनावर धनगर समाज महासंघ तालुका अध्यक्ष श्री. नंदकिशोर शिवराम पुढे, मल्हारसेना तालुका अध्यक्ष श्री. योगेश भिकाजी बाजोड व जिल्हा सचिव (डी.एस.एम.) श्री. अंबादास परसराम गवळे यांच्या सही आहे.






