आशाताई बच्छाव
देवळा, भिला आहेर तालुका प्रतिनिधी –तालुक्यातील निंबोळा येथे धक्कादायक घटना घडली असून भाऊसाहेब उर्फ अभिमन आहेर ५४ वर्षीय इसमाचा मृतदेह निंबोळा चौफुलीजवळील हरणी बंधाऱ्याजवळ आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी देवळा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असली तरी मृतदेहाच्या अवस्थेवरून ही हत्या असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
घटनास्थळी मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला असून डोक्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अपघाताच्या शक्यतेपेक्षा ही हत्या असावी, असा संशय अधिक बळावत चालला आहे.
या पार्श्वभूमीवर, भाऊसाहेब आहेर यांचा कोणाशी वाद झाला होता का? किंवा मागील काही दिवसांत त्यांच्याशी कोणाशी वैर किंवा खडाजंगी झाली होती का? याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे.
शुक्रवारी दि.३० रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास मृतदेह आढळून आल्यानंतर पोलीस निरीक्षक सार्थक नेते यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक दामोदर काळे, विनय देवरे, सुरेश कोरडे,राहुल शिरसाठ व स्थानिक गुन्हे शाखेचे सुधाकर बागुल यांनी घटनास्थळाची पाहणी केली. श्वानपथक व फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले आहे.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, ही नैसर्गिक घटना, अपघात की पूर्वनियोजित हत्या? यावरुन निंबोळा परिसरात उलटसुलट चर्चा रंगत असून पोलिसांकडून सर्व शक्य कोनातून सखोल तपास सुरू आहे.






