Home उतर महाराष्ट्र महापालिका, जि.प. निवडणुकांसाठी धुळ्यातील राजकीय पक्ष सज्ज

महापालिका, जि.प. निवडणुकांसाठी धुळ्यातील राजकीय पक्ष सज्ज

135

आशाताई बच्छाव

1001480854.jpg

महापालिका, जि.प. निवडणुकांसाठी धुळ्यातील राजकीय पक्ष सज्ज
(विरदेल प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) – (धुळे ) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यांत घ्या, असा महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे धुळे महापालिका तसेच धुळे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील नगर पालिकांच्या निवडणुकांचा मार्ग सुध्दा मोकळा होणार आहे. लवकरच या निवडणुका घोषित होतील आणि सध्या प्रशासक असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकशाही मार्गाने निवडणुन आलेले लोकप्रतिनिधी सत्ता सांभाळतील. एकुणच सर्वच राजकीय पक्ष आणि पक्षांचे स्थानिक नेते, कार्यकर्ते या निवडणुकांची आतुरतेने वाट पाहत आहेत. सुप्रिम कोर्टाच्या निकालामुळे लवकरच निवडणुका जाहिर होणार असल्याने धुळे शहर आणि जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या तयारी विषयी दैनिक श्रमराज्यने विविध प्रमुख पक्षांच्या जिल्हाध्यक्ष तसेच प्रमुख नेत्यांच्या प्रतिक्रीया जाणुन घेतल्या आहेत. यात भाजप, शिवसेना, कॉंगे्रस, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी कॉंगे्रस या पक्षाच्या नेत्यांनी सुप्रिम कोर्टाच्या निकालाचे स्वागत केले आहे. तसेच निवडणुकीसाठी सज्ज असून निवडणुका लवकर घ्याव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.

भाजप निवडणुकीसाठी कायमच सज्ज-गजेंद्र अंपळकर
सुप्रिम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचा दिलेल्या आदेशाचे भाजप स्वागत करीत आहे. धुळ्यात भाजपमय वातावरण आजच आहे. एक हजार एक टक्के धुळे महापालिकेवर भाजपचाची सत्ता पुन्हा विराजमान होईल, भाजपचाच झेंडा पुन्हा फडकणार आहे. राहिला निवडणुक तयारीचा विषय तर भारतीय जनता पक्ष निवडणुकीसाठी कायमच सज्ज असतो. एक निवडणुक संपली की दुसर्‍या निवडणुकीसाठी पक्षाची यंत्रणा तयारीला लागते. आणि जनतेच्या भल्यासाठी, जनतेच्या विकासासाठी भाजपच्या वतीने अनेक कामे सुरु असून जनतेच्या आशिर्वादने आम्ही निवडणुकीला समोरे जावून प्रचंड मोठा विजय भाजप मिळवेल. अशी प्रतिक्रीया भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्रशेठ अपंळकर यांनी दिली आहे.

शिवसेना उबाठा निवडणुका पुर्ण ताकदीने लढेल-अतुल सोनवणे
अनेक दिवसांपासून महायुती सरकारचे निवडणुका पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न सुरु होते. मात्र सुप्रिम कोर्टाने चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष याचे स्वागत करतो आणि शिवसेना आणि शिवसैनिक कायम जनतेच्या प्रश्‍नावर लढत असल्याने निवडणुका लढण्यास सुध्दा तयारच आहे. भाजप आणि महायुतीच्या भ्रष्टाचाराविरुध्द आम्ही लढत आहोत, त्यानुसार धुळे शहर आणि जिल्ह्यातील निवडणुका पक्ष श्रेष्ठींच्या आदेशानुसार महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्यास तसेच स्वबळावर सुध्दा लढण्यास तयार आहे. तशी तयारी पक्षाची आजही आहे. निवडणुका जाहिर करा शिवसेना पुर्ण ताकदीने या निवडणुकीत सहभागी होत नक्कीच शिवसेनेचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही. असा विश्‍वास शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांनी व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादी कॉंगे्रस श.प. निवडणुकीसाठी तयार-रणजितराजे भोसले
सुप्रिम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्यासंदर्भात दिलेल्या निकालाचे स्वागत राष्ट्रवादी कॉंगे्रस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आम्ही करतो. भाजप निवडणुका टाळण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र निवडणुका घेण्याचे आता सर्वोच्च न्यायालयानेच आदेश दिले असल्याने भाजपला चपराक बसली आहे. राष्ट्रवादी कॉंगे्रस शरद पवार पक्षाच्या वतीने आम्ही येणार्‍या निवडणुकांसाठी सज्ज आहोत. पक्षाचे वरीष्ठ देतील त्या आदेशानुसार धुळे महापालिका आणि जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणुका लढण्यासाठी पक्षाची तयारी आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकांना सामोरे जाण्यास तसेच वेळ प्रसंगी स्वबळावर सुध्दा लढण्यासाठी तयार आहोत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवाव्यात अशी माझी भुमिका आहे. अशी प्रतिक्रीया रणजितराजे भोसले, शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस श.प. यांनी दिली आहे.

भ्रष्टाचारी भाजपला निवडणुकीत उत्तर देऊ – युवराज करनकाळ
सुप्रिम कोर्टाने चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिले असून त्याचे स्वागत कॉंगे्रसच्या वतीने आम्ही करतो. राज्यातील अनेक महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका ४-४, ५-५ वर्षापासून रखडल्या आहेत. भाजपकडून येथे प्रंचड भ्रष्टाचार केला जात आहे, त्यावर पाघरुन घालण्याचे काम वरच्या पातळीवर सुरु असून याचे उदाहरण बघायचे असेल तर धुळे महापालिकेत पाहता येईल. येथे कॉंक्रीट रस्त्यांवर डांबरी रस्ते केले जातात. एका एका वर्षात रस्ते खोदून पुन्हा रस्ते आणि गटारी केल्या जात आहेत. शेकडो कोटींचा भ्रष्टाचार सुरु आहे. यासर्व भ्रष्टाचारी कारभाराला जनतेच्या आशिर्वादाने दुर करण्यासाठी कॉंगे्रस पक्ष निवडणुकीत उरतेल आणि निश्‍चितपणे आम्ही चांगले उमेदवार देवून निवडणुक लढवणार आहोत. धुळ्यात कॉंगे्रस पक्ष ताकदीने निवडणुक लढवणार असून त्यासाठी आमचा पक्ष तयार आहे. अशी प्रतिक्रीया कॉंगे्रसचे प्रदेश सरचिटणीस युवराज करनकाळ यांनी दिली आहे.

शिवसेना निवडणुकीसाठी कायमच तयार – मनोज मोरे
शिवसेना सुप्रिम कोर्टाच्या निकालाचे स्वागत करते आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर व्हाव्यात अशी आमची सुध्दा ईच्छा आहे. शिवसेना पक्ष निवडणुक जाहिर झाली की तयारी करीत नसतो, तर शिवसेना निवडणुकीसाठी कायमच तयार असते कारण शिवसैनिक आणि शिवसेना पक्ष कायमच जनतेत राहून काम करीत असते. शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून भरघोस असा निधी धुळे शहराच्या आणि जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही आणला आहे. महायुतीचे सरकार राज्यात उत्तम काम करीत आहेत. त्यामुळे महायुतीच्या माध्यमातून तसेच स्वबळावर सुध्दा आम्ही निवडणुकीस सामोरे जाण्यास तयार आहोत. पक्ष श्रेष्ठी घेतील त्या निर्णयानुसार शिवसेना पक्ष महापालिकेच्या निवडणुकीत ताकदीने उतरेल. असा विश्‍वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी बोलून दाखवला आहे.