Home जळगाव बहाळ येथील सरपंच सह तिघे 5 लाखाची लाच स्वीकारताना ACB च्या जाळ्यात…

बहाळ येथील सरपंच सह तिघे 5 लाखाची लाच स्वीकारताना ACB च्या जाळ्यात…

195

आशाताई बच्छाव

1001089471.jpg

बहाळ येथील सरपंच सह तिघे 5 लाखाची लाच स्वीकारताना ACB च्या जाळ्यात…

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- शेतजमिनीबाबत ग्रामपंचायत कडून त्रास होऊ नये त्या मोबदल्यात दीड हजार चौरस फुटाचा प्लॉट खरेदी करून द्यावा लागेल किंवा 10 लाख रूपये द्यावे लागतील
अशी मागणी करून तडजोडीअंती 5 लाख रूपये स्वीकारतांना चाळीसगाव तालुक्यातील बहाळ येथील सरपंच राजेंद्र महादू मोरे याच्यासह
ग्रामपंचायत शिपाई व खाजगी इसम अशा तिघांना आज गुरूवारी दुपारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईने चाळीसगाव तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती अशी की, यातील 70 वर्षीय तक्रारदार यांची मौजे बहाळ रथाचे ता.चाळीसगाव, जि जळगाव येथे गट क्रमांक 57/2 क्षेत्र 1हेक्टर 64 आर अशी शेत जमीन असून सदर शेतजमिनीवर ग्रामपंचायत बहाळ हे त्यांचा हक्क दाखवून सदरची जागा परस्पर इतर व्यक्तीस भाडेतत्त्वावर देण्याची शक्यता असल्याने तक्रारदार यांनी ग्रामपंचायती विरुद्ध न्यायालयातून कायमस्वरूपी मनाई हुकूम आणला होता.
त्यानंतर सरपंच राजेंद्र महादू मोरे यांनी तक्रारदार यांना भेटून त्यांच्या शेतजमिनी बाबत ग्रामपंचायत कडून कोर्ट कचेर्‍यांचा त्रास न होऊ देण्याच्या मोबदल्यात दीड हजार चौरस फुटाचा प्लॉट खरेदी करून द्यावा लागेल असे सांगितले.
मात्र तक्रारदार यांनी प्लॉट स्वरूपात काहीएक देवू नसल्याचे सांगितल्याने सरपंच राजेंद्र मोरे यांनी 29 नोव्हेंबर रोजी 10 लाख रूपये लाचेची मागणी केली.
अन्यथा ग्रामपंचायतीकडून तुला ेकोर्ट कचेरीचा त्रास सहन करावा लागेल असे सांगितले.त्यामुळे तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे कार्यालयात समक्ष येवून तक्रार दिली.
तक्रारदार यांच्या तक्रारीची दि. 29/11/2024 रोजी पंचांग समक्ष पडताळणी केली असता सरपंच राजेंद्र मोरे व ग्रामपंचायत शिपाई शांताराम तुकाराम बोरसे(50) रा.बहाळ रथाचे यांनी तक्रारदार यांच्याकडे दीड हजार चौरस फुटाचा प्लॉट खरेदी करून देण्याच्या स्वरूपात लाचेची मागणी केली असता त्यास तक्रारदार यांनी नकार दिल्याने 10 लाख रूपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 5 लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केले होते.
त्यानंतर सरपंच राजेंद्र मोरे व शिपाई शांताराम बोरसे यांनी तक्रारदार यांना भेटून लाचेची 26 डिसेंबर रोजी बहाळ येथे तक्रारदार यांचे राहते घरी खाजगी इसम सुरेश सोनु ठेंगे (40) रा. बहाळ याचेकडे देण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे आज दि.26 डिसेंबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे येथील पथकाने तक्रारदार यांचे बहाळ येथील राहत्या घरी सापळा लावला असता सरपंच राजेंद्र्र मोरे व शिपाई शांताराम बोरसे यांनी सांगितल्याप्रमाणे लाचेच्या रकमेपैकी पहिला हप्ता 2 लाख रुपये स्वीकारताना सुरेश ठेंगे याला रंगेहात पकडण्यात आले.
याप्रकरणी सरपंच राजेंद्र महादू मोरे, ग्रामपंचायत शिपाई, लिपीक शांताराम तुकाराम बोरसे व खाजगी इसम सुरेश सोनु ठेंगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाच्या पोलीस अधीक्षक शमिष्ठा घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, रूपाली खांडवी यांच्यासह पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रविण मोरे, रामदास बारेला, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली.