आशाताई बच्छाव
शहरात अश्लील चाळ्यांसाठी चालणाऱ्या कॅफेवर पोलिसांनी टाकली धाड
सतीश सावंत-विभागीय प्रतिनिधी : क. स. मा. दे.
देवळा शहरातील महाविद्यालय परिसरात असलेल्या एका कॅफे हाऊस मध्ये देवळा पोलिसांनी अचानक छापा टाकला असून याठिकाणी काही तरुण-तरुणी अश्लील चाळे करताना आढळून आल्याने देवळा पोलिसांनी कॅफे सांचालकावर कारवाई केली आहे. या प्रकाराने संपुर्ण शहरात खळबळ उडाली असून पालकांनी याबाबत सतर्क राहावे, असे आवाहन स.पो.नि. दीपक पाटील यांनी केले आहे.
उच्च शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी शहराची वाट धरत असतात. दरम्यान महाविद्यालय परिसरात असलेल्या कॅफे हाऊस मध्ये तरुण-तरुणी चहा, कॉफी पिण्यासाठी जात असतात मात्र काही कॅफेत चहा हॉटेलच्या नावाखाली वेगळे कारनामे करताना आजकाल अनेक घटना आढळून येत आहे.
*नेमकं घडलं काय?*
देवळा येथील महाविद्यालय परिसरात सटाणा रस्त्यावर डी. एस. पी. बासुंदी नामक चहाचे हॉटेल असून यामध्ये एका रूममध्ये जोडप्यांना जास्तीचे पैसे घेऊन जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची तसेच या कॅफेमध्ये अश्लील चाळे होत असल्याची गोपनीय माहिती देवळा पोलिसांच्या हाती लागताच शनिवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील, पोलीस नाईक बच्छाव, ज्योती गोसावी यांच्या पथकासह वर नमूद केल्याप्रमाणे कॅफेवर छापा टाकण्यात आला. यावेळी त्यांना तिथे एक जोडपे बसून अश्लील चाळे करत असताना आढळून आले.
दरम्यान, पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून हॉटेल मालक प्रशांत उत्तम आहेर यांच्यावर भा. दं. वि. कलम 129,131 (क) मुंबई पोलीस कायदा अन्वये कारवाई केली. नमूद कॅफेच्या आत एक-एक छोटीशी रूम आणि टेबल-खुर्चा ठेवलेल्या आढळून आल्या. सदर ठिकाणी काही जोडपे येऊन त्यांचा निवांत वेळ घालवत असतात. या कारवाईने अश्लील चाळे करणाऱ्या तरुणांचे धाबे दणाणले असून सदर कारवाईने देवळा महाविद्यालयीन शिक्षकांनी आणि पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. यानंतर कुठले हॉटेल किंवा इतर दुकानात असे प्रकार खपवून घेतले जाणार नसून असा प्रकार आढळून आल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी दिली.