Home उतर महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी आ. कानडे यांच्या यशोधन संपर्क कार्यालयात...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी आ. कानडे यांच्या यशोधन संपर्क कार्यालयात मदत केंद्राचा शुभारंभ

79

आशाताई बच्छाव

1000522188.jpg

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी

आ. कानडे यांच्या यशोधन संपर्क कार्यालयात मदत केंद्राचा शुभारंभ

 

श्रीरामपूर,( दिपक कदम तालुका प्रतिनिधी)- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ सुलभतेने मिळण्यासाठी तसेच महिलांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आमदार लहू कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधन संपर्क कार्यालयात मार्गदर्शन व मदत केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.

सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा करून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आ. कानडे यांनी मतदारसंघातील लाभार्थी महिला या योजनेपासून वंचित राहू नये तसेच त्यांना प्रकरणे सादर करण्यासाठी कागदपत्रे मिळण्यास अडचण येऊ नये म्हणून तातडीने यशोधन संपर्क कार्यालयात मार्गदर्शन व मतदान केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शहर व ग्रामीण भागातील महिला बचत गटाच्या पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते फित कापून या केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. पंचायत समितीच्या माजी सभापती व महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस डॉ. वंदना मुरकुटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.

यावेळी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, माजी नगरसेवक अशोक (नाना) कानडे, कलीम कुरेशी, सतीश बोर्डे, राजेंद्र कोकणे, आबा पवार, सुरेश पवार, हरिभाऊ बनसोडे, अमोल अदिक, नानासाहेब रेवाळे, दीपक कदम, रज्जाक पठाण, असलम सय्यद, पंचायत समितीचे श्री. शेरे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे राहुरी येथील महेश आबूज आदींसह शहर व ग्रामीण भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना सचिन गुजर म्हणाले, ही योजना सुरू होताच तहसील व तलाठी कार्यालयात महिलांची मोठी गर्दी झाली आहे, मात्र अनेकांना अर्ज कसे भरायचे त्यासाठीचे दाखले कसे मिळवायचे याबद्दल माहिती नाही, तसेच काही किचकट अटी असल्याने महिला लाभांपासून वंचित राहू नये यासाठी हे मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे, या केंद्राच्या माध्यमातून महिलांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या दाखल्याबाबतचे अडचणी दूर करण्याचा प्रयत्न आहे. आ. कानडे यांनी विधानमंडळात केलेल्या मागणीवरून तलाठ्याचा दाखला ग्राह्य धरण्याचे तसेच योजनेचे अर्ज ऑनलाईन तसेच ऑफलाईन स्वीकारण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी योजनेसाठी अर्ज करून त्याचा लाभ घ्यावा.

अरुण नाईक म्हणाले की, आ. कानडे यांनी अनेक वर्षे अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यांना सामाजिक बांधिलकी जपण्याची व समाजाची जाण आहे. महिलांच्या अडचणी माहित आहेत. त्यामुळे त्यांनी येथे मदत केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. या केंद्रामुळे निश्चितपणे महिलांच्या समस्या दूर होऊन त्यांना सुलभपणे योजनेचा लाभ मिळेल.

डॉ. वंदना मुरकुटे म्हणाल्या, शासनाच्या कधी व काय योजना येतील ते सांगता येत नाही. महिलांनी याबाबत सजग राहावे. ज्याप्रमाणे आपण वाळवण घालून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे नियोजन करतो. त्याचप्रमाणे महिलांनी आपले आधारकार्ड मोबाईलची लिंक ठेवणे, पॅन कार्ड लिंक ठेवणे अशांसह कागदपत्रांची अगोदरच जुळवाजुळव करून ठेवावी. जेणेकरून योजनांचा लाभ घेताना अडचणी येणार नाहीत. या योजनेसाठी काहीही अडचण आली तरी महिलांनी मदत केंद्राशी संपर्क साधून त्या सोडवून घ्याव्यात.

योजनेतील काही अटींमुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. मदत केंद्राच्या माध्यमातून महिलांना येणाऱ्या अडचणी सोडविल्या जाणार आहेत. आवश्यकता भासल्यास अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन अडचणी सोडविण्याबाबतचे नियोजन केले जाईल. परंतु काही लोक संधीचा फायदा घेऊन महिलांची आर्थिक लूट करू शकतात. पैसे मागणारे काही दलाल निर्माण होण्याची शक्यता आहे. महिलांनी अशा लोकांना पैसे न देता त्यांच्यापासून सावध राहावे, असे आवाहन अशोक (नाना) कानडे यांनी यावेळी केले.

यावेळी वंदना उंडे, भारती बोकफोडे, स्वाती लंगोटे, अश्विनी चव्हाण, संगीता ठोंबरे, प्रतिभा दंडवते या बचत गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रज्जाक पठाण, असलम सय्यद यांनीही मनोगत व्यक्त केले. महेश आबूज यांनी या योजनेविषयीची सविस्तर माहिती दिली. ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी आभार मानले.

……………

Previous articleवानखेड गावात घाणीचे साम्राज्य.ग्रामस्थांमध्ये संताप : ग्रामपंचायत मध्ये गटविकास अधिकाऱ्यांसह ग्रामसेवकाचे दुर्लक्ष
Next articleलोहगाव विकास कामापासून वंचित
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.