आशाताई बच्छाव
जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न
जिल्हा वार्षिक योजनेतंर्गतचा निधी विकास कामांवर वेळेत खर्च करावा
–– पालकमंत्री अतुल सावे
जालना, दि. 25 (दिलीप बोंडे ब्युरो चीफ):- जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरीता मंजूर झालेला निधी विविध विकास कामांवर वेळेत खर्च करावा. तसेच सन 2023-24 या वर्षातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण समिती विभागाचे मंत्री तथा जालना जिल्हयाचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आज जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल भवनात आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी श्री. सावे बोलत होते. बैठकीस आमदार बबनराव लोणीकर, आमदार राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल सूर्यवंशी आदींसह सर्व विभागप्रमुख यांची उपस्थिती होती.
सन 2024-25 अंतर्गत सर्वसाधारण वार्षिक योजनेसाठी 390 कोटी नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. हा संपूर्ण निधी वेळेत खर्च करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने प्रशासकीय मान्यता घेऊन विकास कामे जलदगतीने पूर्ण करावीत. निधी परत जाऊ देऊ नये, याची विभागप्रमुखांनी दक्षता घेण्याची सूचना करुन पालकमंत्री अतुल सावे म्हणाले की, सन 2023-24 या वर्षातील प्रलंबित कामेही गतीने पूर्ण करावीत. तसेच पीक कर्जाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यात यावे. शेतकऱ्यांना खताची टंचाई भासू देऊ नये. बोगस बियाणे, खताबाबतच्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन कार्यवाई करावी.