Home सामाजिक शिवरायांचा इतिहास सदैव प्रेरणादायी…! 19 फेब्रुवारी ‘शिवजन्मोत्सव’

शिवरायांचा इतिहास सदैव प्रेरणादायी…! 19 फेब्रुवारी ‘शिवजन्मोत्सव’

127

आशाताई बच्छाव

IMG_20240219_042902.jpg

शिवरायांचा इतिहास सदैव प्रेरणादायी…!
19 फेब्रुवारी ‘शिवजन्मोत्सव’
——————————————– हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रेरणादायी इतिहास आपण या लेखात अभ्यासणार आहोत.संपूर्ण विश्वामध्ये 19 फेब्रुवारी हा दिवस अतिशय आनंदाने, उत्साहाने साजरा केला जातो, कारण छत्रपती शिवाजी महाराज यांची साडेतीनशे वर्षानंतरही जयंती तेवढ्याच जोमाने, ताकतीने, धुमधडाक्यात आजही साजरी केली जाते. कारण काय असेल? त्यासाठीच हा लेखन प्रपंच……..
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापूर्वीची जी सामाजिक परिस्थिती होती ती परिस्थिती त्यांच्या जन्मानंतर राहिली नाही. ज्या परकीय सत्ता या ठिकाणी आक्रमण करत होत्या त्या सत्तांना पळून लावण्याचे काम महाराजांनी केले. आणि आपल्या स्वराज्यातील रयतेला मानवता शिकवली म्हणूनच त्यांचा जन्मोत्सव आपण साजरा करतो. तसेच आपल्या समाजामध्ये अनेक अंधश्रद्धा, रूढी ,परंपरा, प्रथा, वेडगळ समजुती या तुंडूब भरलेल्या आहेत परंतु हे शिवाजी महाराजांनी सर्व बाजूला सारलं. सतीची चाल ही पूर्वीपासून चालत आली होती.
परंतु खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी मातोश्री आईला म्हणजेच जिजाऊ साहेबांना सती जाण्यापासून थांबवले. ही क्रांतिकारी घटना त्या काळात घडली आणि तेव्हापासून जवळजवळ सतीची प्रथा बंदच झाली ही क्रांतिकारी घटना होती, म्हणून आपल्याला शिवजन्मोत्सव साजरा करावा वाटतो ,तसेच अंधश्रद्धेबद्दल बोलायचं झाल्यास मनाच्या अंधश्रद्धा आहेत काही लोकांनी त्या सुरू ठेवलेल्या आहेत. निरक्षरतेचा फायदा घेऊन या केल्या जातात म्हणून त्यांनी कोणत्याही लढाईला जाते वेळेस अमावस्येच्या रात्री ते जात होते. यामुळे हे शकुन अपशकुन थोतांड आहे हे आपल्याला समजते, आपल्या अंत:करणातून कळते ,परस्त्रीला मातेसमान मानावे, कल्याणच्या सुभेदाराची सून सैनिकांनी महाराजा पुढे आणून उभी केली; परंतु त्या मातेला त्यांनी परत त्यांच्या घरी नेऊन सोडावे, त्यांना साडी चोळी बांगडी करून जमिनीचा तुकडा दिला ही मनाची श्रीमंती व स्त्रीबद्दल आदर त्यांच्याकडे होता, परस्त्रियांचा त्यांनी सन्मान केला होता. म्हणूनच आपल्याला त्यांचे स्मरण होते.
असे मला या ठिकाणी सांगायचे आहे. धार्मिकतेबद्दल बोलायचे असल्यास सर्वधर्म एक आहेत याची शिकवण त्यांनी दिली. सर्व मानव एक आहेत. वतनदारी, जहागिरी पध्दत बंद करून त्यांनी रोख रक्कम सैनिकांना दिली होती ,यामुळे सर्वांना समानता आली होती, अहंकार आणि गर्व नाहीसा झाला होता , गुणवंताना त्यांनी त्यांचे गुण पाहून स्वराज्यामध्ये मावळे म्हणून एकत्रित केले. आणि स्वराज्य निर्माण केले. त्यामुळे कोणत्याही धर्माला त्यांनी अधिकृत धर्म मानला नाही. सर्वधर्म सारखे आहेत ही शिकवण त्यांच्या पासूनच मिळते. त्यासाठी हा शिवजन्मोत्सव साजरा करावा असं प्रत्येकाला वाटते ,म्हणूनच घराघरातून, शाळा महाविद्यालयातून, वेगवेगळ्या पतसंस्थानातून ,गड किल्ल्यातून सर्व कर्मचारी, शासकीय, प्रशासकीय ऑफिस मधून, निमशासकीय सेवेतील लोकांकडून आबालवृद्धांकडून तेवढ्याच उत्साहाने हा शिवजन्मोत्सव साजरा करावा असे प्रत्येकालाच वाटते.
भारत हा कृषिप्रधान देश आहे येथील शेतकरी सुखी राहायला पाहिजे. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये असे त्यांनी सैनिकांना ताकद दिली होती. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे त्याच्या शेतातलं पीक जर तुडवण्यात गेले तर तो खाईल काय? म्हणून शेतकऱ्यांना त्रास देऊ नये असे त्यांनी सक्त ताकीद दिली होती. शेतीची पुन्हा मोजणी करून घेतली होती ,पर्यावरणाची काळजी घेऊन झाडे लावा झाडे जगवा.जे वाळलेले लाकूड आहे त्याचा उपयोग करा. ते विज्ञानवादी होते, त्यामुळेच तर त्यांनी त्या काळात पर्यावरणाचे महत्त्व विशद केले होते ,आज्ञापत्रातून ते सांगतात म्हणून तो विचार आज आपण तंतोतंत पाळतो खरोखर आज तापमान वाढत आहे. जर वृक्ष नसले तर काय झालं असते? हे आठवण शिवरायांच्या आज्ञापत्रातून पर्यावरणामधून आज आपल्याला कळते म्हणून आपण त्यांचा जन्मोत्सव साजरा करतो, आदिलशाही, कुतुबशाही ,मुघलशाही, व-हाडशाही इमादशाही या सर्वांना त्यांनी जसेच्या तसे उत्तर देऊन माघारी पाठविले. आपले आरमार जोपर्यंत मजबूत नाही तोपर्यंत आपल्याला केव्हाही परकीय सत्ता आपल्या वर हल्ला करू शकतात म्हणून त्यांनी दौलतखान सारख्या महान व्यक्तीला आरमाराचे प्रमुख बनविले आणि इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज यांना ताकीद दिली त्यामुळे आज आपली किनारपट्टी सुरक्षित आहे, असे म्हणता येईल. महाराजांनी सुरतेला बेसुरत केले कारण धर्मांध असणाऱ्या शक्तीने पुण्यावर हल्ला केला होता त्याचा बदला म्हणून ठकास महाठक असे ते म्हणत होते. म्हणूनच त्यांनी दोन वेळेस सुरत लुटून अद्दल घडवली होती. पुढचा प्रसंग आग्रा येथील सुटका सांगायचे असेल तर किती चपळाईने त्यांनी सुटका करून घेतली. त्यानंतर नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी शिवचरित्र वाचून तसाच प्रसंग घडवून आणला आणि ते वेशांतर करून आपल्या देशात आले या अशा कितीतरी गोष्टी शिवाजी महाराजा
कडून आपल्याला शिकायला मिळतात. 6 जून 1674 रोजी रायगडावर त्यांनी राज्याभिषेक करून घेतले, त्यामुळे हे हिंदवी स्वराज्याचे सार्वभौम राजे झाले. स्वतःची आपल्याला होन आणि शिवराई नाणी पाडली, राज्यव्यवहारकोश नावाचा ग्रंथ तयार करण्यात आला. आपली शक कालगणना तयार करण्यात आली नंतर त्यांनी दिग्विजय मोहीम काढून आपणही राजे आहोत हे संपूर्ण जगाला दाखवून दिले. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आज आपल्याला प्रेरणादायी व स्फूर्ती वाढविणाऱ्या आहेत.
म्हणून नीतिमत्ता, शौर्य, धैर्य ,चपळता धूर्तपणा हे गुण त्यांच्याकडून आपल्याला शिकता येतात ,सर्व जातींना एकत्रित घेऊन चालणारे ते महान राजे होते, आपल्या जीवनामध्ये आई-वडिलांना किती मान आहे. सन्मान आहे हे त्यांच्याकडून शिकावे, नेहमी लढायावर जाते वेळेस आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन ते जात होते, आईकडून त्यांनी अनेक विद्या शिकल्या, आई पेक्षा कोणीही या जगात मोठ दैवत नाही हे त्यांच्याकडून शिकावं म्हणून राष्ट्रमाता जिजाऊ यांचे आपल्याला स्मरण होण्यासाठी आपण हा शिवजन्मोत्सव साजरा करत आहोत. जावळीचे चंद्रराव हे मुजोर आहेत, स्वराज्याच्या विरोधात जातात शत्रूसैनिकांना जाऊन भेटतात अशा जावळीच्या मोर्‍यांना त्यांनी अद्दल घडवली यातून कठोर शासन झाले, असे आपणास म्हणता येईल, माणसाला माणूस म्हणून उभे करण्यासाठी आपल्या आजीवन काळात त्यांनी कधीच आराम केला नाही म्हणून शिवाजी महाराज हे यशवंत, ज्ञानवंत, कीर्तीवंत जाणता राजा, राष्ट्रपालक, गोपालक , कुळवाडी भूषण, राजाधिराज ,संस्कृती रक्षक अशा कितीतरी उपाधींनी त्यांना संबोधता येते .महान योध्दा म्हणून त्यांना जगात ओळखले जाते. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी मानवतावादी विचार पेरले ,आपल्याला स्वाभिमान शिकवला ,अस्थिर असलेल्या लोकांना संघटित केले, परकीयांपासून आपला बचाव केला, वेळप्रसंगी शत्रू सोबत त्यांनी तह केले परंतु ते हरले नाहीत परत त्यांनी आपले गड किल्ले जिंकून घेतले यातून आपल्याला असा बोध होतो की वेळप्रसंगी दोन पावले मागे सुद्धा घेता यावेत ही शिकवण त्यांच्या आचरणातून मिळते ,लेकीबाळीची अब्रू वाचवली, शत्रूला सुद्धा हेवा वाटावे ,खरोखरच ते राजे होते म्हणून शत्रूंनी सुद्धा राजा असावा तर शिवबा सारखा असे म्हणून मुक्तकंठाने प्रशंसा केली, म्हणून त्यांचे संपूर्ण जीवन हे संघर्षमय असून आपणास सदैव प्रेरणादायी आहे त्यासाठीच आपण त्यांचा जन्मदिन मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत. आजची परिस्थिती पाहता आपण दुसऱ्यासाठी काय करत आहोत ? याचा तरुणांनी विचार करावा, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण आपल्या अंगी येण्यासाठी आपल्याला काय करता येईल? हे अगोदर अभ्यासावे, फक्त एक दिवस जयंती साजरी करून त्यांचे गुण आपल्या अंगी येणार नाहीत याची काळजी घ्यावी, परस्त्रियांना मातेसमान मानून, वडीलधाऱ्या व्यक्तींचा मान राखून ,शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव देऊन, गुन्हेगारांना शिक्षा देऊन फितुरांना अद्दल घडवून ,सर्वजण आपण गुण्यागोविंदांने नांदावे, तेव्हा ही शिवजयंती यशस्वी झाली असे आपल्याला म्हणता येईल आणि तेव्हाच खरे समाधान मिळेल, शिवजन्मोत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा,
प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपत अध्यक्ष: विठूमाऊली प्रतिष्ठान खैरका वाडी ता.मुखेड जि.नांदेड

Previous articleविज्ञान शाप की वरदान!
Next articleमाझ्या राजाचं नाव गाजतयं- गड किल्ल्याच्या दगडावर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.