Home सामाजिक ऐकावे जनाचे करावे मनाचे

ऐकावे जनाचे करावे मनाचे

313

आशाताई बच्छाव

IMG_20240205_052827.jpg

ऐकावे जनाचे करावे मनाचे

आपण बघतो की कित्येक लोक जीवनात अपयशी ठरतात.याला दुसरी कारणं असली तरी मुख्य कारण म्हणजे त्या व्यक्तीने घेतलेले निर्णय. माणसे अपयशी होतात कारण ती माणसे आपल्या मतांवर ठाम राहत नाही.आपले निर्णय वारंवार बदलत असतात.कोणी काही बोललं की त्याचा सतत विचार करणे,दुसरे आपल्याविषयी काय विचार करतील याचाच विचार करत राहणे, अश्या गोष्टींमुळे ती माणसे काहीही निर्णय घेण्यास सक्षम नसतात.म्हणजेच दुस-यांच्या मतांचा त्यांच्यावर जास्त पगडा असतो.लोकांच्या बोलल्याने ते प्रभावित होतात.
काही लोकांना दुसऱ्यांना डिवचण्यात, दुसऱ्यांना खाली दाखवण्यात आनंद मिळतो.काही लोकांवर अशा नकारात्मक लोकांचा प्रभाव पडतो किंवा ते पाडून घेतात.अशावेळी त्यांची मानसिक स्थिती दोलायमान होऊन ते कुठल्याच निर्णयावर ठाम राहू शकत नाही.”ऐकावे जनाचे करावे मनाचे” असे आपल्या पूर्वजांनी म्हटलेलं आहे ते काही उगाच नाही.जर तुम्ही इतरांच्या मताला अवास्तव महत्त्व दिले तर तुमचे स्वतःचे मत कधीच बनवू शकणार नाही.सर्वच लोकांशी आपले सुरताल मिळतातच असे नाही.पण काही लोक नक्कीच असे असतात ज्यांना आपल्याबद्दल सहानुभूती असते.त्यांच्याशी चर्चा करून आपण अडचणीतून मार्ग काढू शकतो.नीट विचार करून निर्णय घेणारे आणि त्या निर्णयाला चिकटून राहणारे लोक आयुष्यात यशस्वी होतात.कारण त्यांचा स्वतःच्या मतांवर पूर्ण विश्वास असतो.याउलट जे लोक आपल्या मतांवर ठाम राहत नाही, एकसारखे निर्णय बदलतात,ते निर्णय घेण्याचा अधिकार दुसऱ्यांना देतात.कधीकधी आपली अवस्था लहान मुलाप्रमाणे होते.काय निर्णय घ्यावे सुचत नाही.अशावेळी इतरांचे सल्ले घेणे योग्यच आहे.पण त्यांच्या सल्ल्यानुसार न वागता आपण शांतपणे विचार करून आपल्याला जो पटेल तोच निर्णय घ्यावा.त्यामुळे आपली मानसिक कुचंबणा होत नाही.आपले पूर्वज स्वतः घेतलेल्या अनुभवांवरून म्हणी तयार करत गेले.एखाद्या गोष्टीचा आपल्याला निश्चित निर्णय घेता येत नसेल तर इतरांकडून सल्ले घ्यायला काहीच हरकत नाही.पण आपल्यात आपले निर्णय स्वतः घ्यायची क्षमता हवी.इतरांच्या सल्ल्याकडे एक पर्याय म्हणून बघावे. त्यांचे विचार पटले तर अवश्य त्याची अंमलबजावणी करावी, अन्यथा आपल्याला जे योग्य वाटते तेच करावे.कधीकधी लक्षात येतं की काहींचे सल्ले बरोबर होते.पण आपण ते अमुक केलं असतं तर बरं झालं असतं असा विचार करण्याचा उपयोग नसतो.कारण ती वेळ निघून गेलेली असते.पण आपल्या चुकांमुळे अनुभव मात्र पदरात पडतो.तरीही आपले निर्णय आपणच घ्यावे.त्यामुळे एकतर आपल्या चुकांचे खापर आपण दुसऱ्यावर फोडत नाही आणि दुसरे म्हणजे आपला निर्णय चुकला याची जाणीव होऊन आपण पुन्हा प्रयत्न करतो.पुढे तीच चूक होणार नाही याची दक्षता घेतो.नव्या उमेदीने कामाला लागतो.मन फार चंचल आहे.मनात येणारे विचार सकारात्मक असतील तर आपल्या विचारांमध्ये ताकद येईल आणि मनातील नकारात्मकता विचार कमी होतील.त्यासाठी आपण योग,मेडिटेशन या साधनांचा उपयोग करू शकतो.सर्वात सोपा उपाय म्हणजे आपले छंद जोपासणे.स्वत:ला आपल्या आवडत्या कामात गुंतवून घेणे हे सर्वात प्रभावी काम आहे.
प्रत्येकजण वेगवेगळ्या परिस्थितीत वावरत असतो.त्यामुळे प्रत्येकाकडून मिळणारे सल्लेही वेगवेगळे असतात.त्यामुळे लोक आपल्याला काहीही सल्ला देऊ देत, आपल्याला कितपत पटतं हे पडताळून पाहायचं.आपण नेहमी स्वतःचा मार्ग शोधून त्याप्रमाणे काम करावे.म्हणूनच “ऐकावे जनाचे करावे मनाचे” ही म्हण सार्थ ठरते.

लैलेशा भुरे
नागपूर

Previous articleसुंदरता हा कलेचा आत्‍मा —
Next articleनांदेड दक्षिण मतदार संघात मा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ७ फेब्रुवारी रोजी बुथ कमिटी ची बैठक- आ. हंबर्डे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.