Home नाशिक लासलगाव बाजार समिती सभापतीपदी बाळासाहेब क्षिरसागर तर उपसभापतीपदी गणेश डोमाडे बिनविरोध

लासलगाव बाजार समिती सभापतीपदी बाळासाहेब क्षिरसागर तर उपसभापतीपदी गणेश डोमाडे बिनविरोध

171

आशाताई बच्छाव

IMG-20230525-WA0034.jpg

लासलगाव बाजार समिती सभापतीपदी बाळासाहेब क्षिरसागर तर उपसभापतीपदी गणेश डोमाडे बिनविरोध

निफाड (रामभाऊ आवारे)

आशिया खंडात सर्वात मोठी उलाढाल असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी बाळासाहेब क्षिरसागर तर उपसभापतीपदी गणेश डोमाडे यांची चमत्कारिकरीत्या बिनविरोध निवड झाली आहे. लासलगाव बाजार समिती माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात येत असल्यामुळे आज होणाऱ्या सभापती निवडीकडे राज्याचे लक्ष लागून होते.
बाजार समिती पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी ज्ञानेश्वर जगताप व पंढरीनाथ थोरे गटाला ९ जागा तर मा.जि.प.अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर व जयदत्त होळकर या माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ समर्थक गटाला ८ जागा, तर एक अपक्ष विजयी झाले. भुजबळ समर्थक गटाचे ज्ञानेश्वर गांगुर्डे व सत्ताधारी थोरे व जगताप गटाचे बाळासाहेब दराडे यांना समसमान मते पडली. सोडतीद्वारे बाळासाहेब दराडे यांना विजयी घोषित केले. त्यामुळे भुजबळ समर्थक गटाचे बहुमत हुकले व विरोधी गटाला निसटते बहुमत मिळाले होते. त्यामुळे चमत्कारानेच भुजबळ समर्थक गटाचा सभापती होणे शक्य होते. त्यामुळे फोडतोडीचे राजकारण होईल असे वाटत असताना सभापती पदासाठी भुजबळ समर्थक पॅनलचे बाळासाहेब क्षिरसागर यांचा व उपसभापती पदासाठी विरोधी पक्षाचे गणेश डोमाडे यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार शरद घोरपडे यांनी घोषित केले.
याप्रसंगी जयदत्त होळकर, पंढरीनाथ थोरे, ज्ञानेश्वर जगताप, दिलीप खैरे, राजेंद्र डोखळे, सुवर्णाताई जगताप, प्रकाश दायमा, डॉ. श्रीकांत आवारे, सोनिया होळकर, तानाजी आंधळे, ललित दरेकर, प्रवीण कदम, भीमराज काळे, छबुराव जाधव, राजेंद्र बोरगुडे, महेश पठाडे, बाळासाहेब दराडे, रमेश पालवे, मंगेश गवळी, समाधान जेजुरकर, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, नितीन गायकवाड, यांच्यासह सर्व संचालक मंडळ व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

सत्तेसाठी दोन्ही गट एकत्र –राजकारण्यांचा अजब नमुना

@ आशिया खंडात सर्वात मोठी आर्थिक उलाढाल व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री ना.छगन भुजबळ यांच्या मतदार संघात ही बाजार समिती येत असल्याने निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. त्यामुळे निवडणूक काळात मोठी चुरस पाहायला मिळाली. या निवडणुकीत सर्वच पक्षाचे विशेषतः राष्ट्रवादीचेच दोन गट तयार झाले होते. त्यामुळे गावागावात गटाचे राजकारण निर्माण झाले होते. या निवडणुकीत मोठया प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्याचीही चर्चा होती. मात्र ऐन सभापती निवडीच्या वेळी आणि त्यांनतर दोन्ही गट एकत्र जल्लोष करतांना दिसल्याने या निवडीच्या निमित्ताने राजकारणाचा अजब नमुना पहायला मिळाला आहे.