आशाताई बच्छाव
संत साहित्याचे अभ्यासक व भारूडकार डॉ. रामचंद्र देखणे यांचे पुण्यात निधन रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
संत साहित्याचे आणि लोकवाङ्मयाचे अभ्यासक, मराठी लेखक, संशोधक, प्रसिद्ध व्याख्याते, प्रवचनकार आणि भारूडकार डॉ. रामचंद्र देखणे यांचे पुण्यात निधन झाले. मृत्यूसमयी ते ६७ वर्षांचे होते. सोमवारी सायंकाळी घरत पूजा करत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. आज (मंगळवार) सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
डॉ. रामचंद्र देखणे हे उत्तम वक्ते होते. त्यांनी गेल्या काही वर्षांत विविध विषयांवर अनेक व्याख्याने दिली. देशविदेशांत त्यांनी हजारो कार्यक्रम केले होते. १४ मे २०१९ रोजी त्यांनी २१०० व्या भारुडाचा कार्यक्रम केला होता. ’दादला नको गं बाई’ व, ’नणदेचं कार्टं किरकिर करतंय’ आदि प्रतीकांतील त्यांची भारुडे विशेष लोकप्रिय झाली होती. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
घटस्थापनेमुळे डॉ. देखणे हे शनिवार पेठेतील घरीच होते. सायंकाळी सातच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. कुटुंबियांनी तातडीने त्यांना खासगी रुग्णालयात नेले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.