आशाताई बच्छाव
साक्री तालुक्यातील टिटाणे येथे अवकाळी पावसाचा जोर! कापूस, मक्यासह चारा पिकांचे मोठे नुकसान
साक्री, संदीप वसंतराव पाटील ब्युरो चीफ –तालुक्यात अवकाळी पावसाने कहर माजविला. टिटाणे शिवारात अधिक पाऊस झाल्याने कापूस, मका आणि चारा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परिणामी हाताशी आलेला घास हिराविल्याने बळीराजापुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
साक्री तालुक्यातील टिटाणे परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे बळीराजाची दिवाळी शेतीकामात गेली. गेल्या दोन दिवसांपासून या भागात अवकाळी पावसाने थैमान माजविले आहे. पावसामुळे कापूस, मका तसेच जनावरांसाठी उपयुक्त असणाऱ्या चारा
पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली असून शेतांमधील उभे पीक पूर्णतः नष्ट झाली आहेत. दिवाळीच्या सणाच्या काळात शेतकरी वर्ग आनंद साजरा करण्याऐवजी शेतातील पाण्याचा निचरा करण्यात, कोरडी झालेली पिके वाचवण्याच्या प्रयत्नात मग्न होता. दिवाळी सण गेला पण बऱ्याच शेतकऱ्यांच्या घरात दिवा लावायलाही पैसा नाही अशी स्थिती निर्माण झाली. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत शासनाने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी अनेक ठिकाणी पंचनामे सुरूच झाले नाहीत, अशी स्थिती आहे. ज्याठिकाणी पंचनामे झाले
आहेत, तिथेही मदतीचा एक रुपया अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आणि नाराजीचे वातावरण आहे. टिटाणे, खोरी, छडवेल परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तत्काळ सर्वेक्षण करून प्रति हेक्टर नुकसान भरपाई थेट खात्यात जमा करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, टिटाणे शिवारातील शेतकरी विजय बागुल, प्रशांत देवरे, रवींद्र देवरे, चंद्रकांत देवरे, कलीम पिंजारी, पंकज देशमुख, संदीप पाटील, कृष्णा पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शासनाच्या नुकसानीच्या भरपाईबाबतच्या घोषणा फक्त कागदावरच राहिल्या आहेत. शासन फक्त दिलासा देतंय, पण हातात काहीच मिळत नाही अशी खंतही बागुल यांनी व्यक्त केली.






