आशाताई बच्छाव
कळमदरे गावी माजी विद्यार्थी मेळावा – “माझी शाळा माझा अभिमान” स्नेहमेळावा संपन्न
चांदवड, सुनील गांगुर्डे विभागीय संपादक –काल २५ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कळमदरे येथे ,“माझी शाळा माझा अभिमान” या घोषवाक्याखाली माजी विद्यार्थी मेळावा अत्यंत उत्साहात आणि आनंदात पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे प्रथम बॅचचे( सन 1957-58)चे माजी विद्यार्थी मा.श्री रंगनाथजी गांगुर्डे ( रिटायर्ड प्राध्यापक)यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून (सन 1957 ते 1962 पर्यंतचे) मा.जयरामजी गांगुर्डे(आरोग्य विभाग),माणिकजी गांगुर्डे(मा.शिक्षक),रामनाथजी गांगुर्डे (ITI क्लर्क,नाशिक), बाळासाहेबजी गांगुर्डे(ST महामंडळ पर्यवेक्षक),गावचे सरपंच सुरेशजी गांगुर्डे (गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर & सिविल इंजिनीअर) तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असलेले माजी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत करत मुख्याध्यापकांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेत शाळेची यशस्वी वाटचाल मांडली.
माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी शाळेच्या विकासासाठी आवश्यक त्या सर्व प्रकारचे सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.शाळेच्या ३ ऱ्या वर्गखोलीसाठी लोकवर्गणी जमा करून काम सुरु करण्यासाठी लगेचच नियोजन आखण्यात आले.शाळेसाठी माजी विद्यार्थ्यांच्या योगदानातून नुकतेच 16000 लिटर पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण झाले त्यासाठी योगदान देणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांना आयकार्ड वाटप करणाऱ्या तसेच शाळेसाठी विविध वस्तुरूपाने,रोखस्वरूपात योगदान देणाऱ्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
मेळाव्यादरम्यान परिसरात उत्साह, आनंद आणि “माझी शाळा माझा अभिमान” हा भाव सर्वत्र पसरला होता.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती,शालेय शिक्षक वृंद व ग्रामस्थांनी मेहनत घेतली.






