आशाताई बच्छाव
नागपूर दीक्षाभूमीसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडाव्यात – रिपाईची रेल्वे प्रशासनाकडे मागणी
अहिल्यानगर प्रतिनिधी दिपक कदम– येत्या 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या दिवशी नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीवर देशभरातून लाखो बौद्ध अनुयायी दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)च्या वतीने रेल्वे प्रशासनाकडे नागपूरकडे विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची आणि सध्या चालू असलेल्या गाड्यांना अतिरिक्त डबे (बोग्या) जोडण्याची मागणी करण्यात आली आहे.
या मागणीसाठी रिपाईचे विभागीय जिल्हाप्रमुख भीमराज बागुल जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने रेल्वे स्टेशनप्रमुख एम. पी. पांडे यांना निवेदन सादर केले. या शिष्टमंडळात , तालुकाध्यक्ष सुनील शिरसाठ तसेच रिपाई नेते महेंद्र त्रिभुवन, जिल्हा सल्लागार अशोक गायकवाड, जिल्हा संघटक राजू नाना गायकवाड, युवक शहराध्यक्ष विशाल सुरडकर, प्रदीप कदम, राजू काकडे, अक्षय खरात यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, 1956 साली विजयादशमीच्या दिवशी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांसमवेत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. तेव्हापासून हा दिवस बौद्ध बांधवांसाठी अत्यंत पवित्र आणि भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. देशभरातून, तसेच नगर जिल्ह्यातून हजारो बौद्ध बांधव दरवर्षी नागपूरला दीक्षाभूमीवर जाण्यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र, रेल्वे गाड्यांची संख्या कमी असल्याने अनेक प्रवाशांना अपार त्रास सहन करावा लागतो.
या पार्श्वभूमीवर, रेल्वे प्रशासनाने दीक्षाभूमीकडे विशेष गाड्यांची सोय करावी, तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या गाड्यांना अतिरिक्त डबे जोडावेत, जेणेकरून कोणीही प्रवासी गैरसोयीमुळे मागे राहणार नाही, अशी मागणी रिपाईकडून करण्यात आली आहे.