आशाताई बच्छाव
जालना तालूक्यातील रोहनवाडी आणि पानशेंद्रा भागात अतिवृष्टीने झालेल्या
नुकसानग्रस्त भागाची उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली पाहणी
जालना, दि.26 (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) : जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने झाल्याने जिल्ह्यातील अनेक भागातील शेतपिकांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री श्री. उदय सामंत यांनी आज जालना तालूक्यातील रोहनवाडी आणि पानशेंद्रा या गावात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतपिकाची पाहणी केली.
यावेळी श्री. सामंत यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधुन, या नैसर्गिक संकटाच्या वेळी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असुन, बाधीत शेतकऱ्यांना शासन सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे व त्यांना न्याय मिळवून देण्याची आमची जबाबदारी आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. कृषिमंत्र्यांनी सगळ्या उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांना सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पंचनामे करुन, शासनामार्फत नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत पोहोचविण्यात येणार असल्याचेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आमदार अर्जुन खोतकर, उपविभागीय अधिकारी श्री. दौड, तहसिलदार श्रीमती छाया पवार, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासह रोहनवाडी आणि पानशेंद्रा या गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या.