आशाताई बच्छाव
देगलूर शहरात पावसात निर्माण झाला जलतलाव; नागरिक संतप्त
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
देगलूर शहरातील पाण्याच्या टाकीजवळचा मुख्य रस्ता पावसामुळे खड्ड्यांनी भरून गेला असून, अंबिका बुक सेंटर आणि जय मल्हार हॉटेलसमोर अक्षरशः जलतलाव तयार झाला आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे खड्डे दिसेनासे झाले असून, वाहनधारकांना दररोज अपघाताचा धोका पत्करावा लागत आहे.
वाहतुकीचा कणा ठरणारा रस्ता खचला
शहराच्या मध्यवर्ती आणि महत्त्वाच्या रस्त्याची ही स्थिती नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरते आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमुळे रस्त्यावरून चालणेही कठीण झाले असून, पावसाचं पाणी खड्ड्यांत साचल्यामुळे दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
प्रशासनाचा ठरतोय उदासीनपणा
या रस्त्याची दुरवस्था ही केवळ अपघातांना निमंत्रणच नाही, तर प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. नागरिकांनी यापूर्वीही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पालिका प्रशासनाकडे अनेकदा पाठपुरावा केला. मात्र, अद्याप कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही.
सामाजिक माध्यमांवर संतापाची लाट
प्रशासनाचे दुर्लक्ष पाहता आता नागरिकांनी सोशल मीडियावरूनही आवाज उठवायला सुरुवात केली आहे. “खड्डे बुजवा, अन्यथा रस्त्यावर उतरण्याची वेळ येईल,” असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना अपेक्षित
शहराची प्रतिमा जपण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने लक्ष घालून रस्ता दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
रोजच्या अपघातांची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने आता तरी जागं व्हावं, हीच अपेक्षा!






