आशाताई बच्छाव
देगलूर शहरातील मदनुर नाक्यावरील सर्कल उभारणीचे काम थंड बस्त्यात;
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यशैलीबद्दल वाहनधारकांमध्ये नाराजी…
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
देगलूर: शहरातील मदनुर नाका येथे गोल सर्कल नसल्यामुळे अनेकदा वाहनांची समोरासमोर धडक होऊन अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. त्या अनुषंगाने येथे गोल सर्कल उभारून होणारे अपघात टाळावे यासाठ एका सामाजिक कार्यकर्त्याने निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले होते. मात्र ११ महीने लोटूनही परिस्थिती ‘जैसे थे’ च असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यशैलीबद्दल वाहनधारकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
नांदेडकडून देगलूर मार्गे हैदराबाद कडे जाणाऱ्या व हैदराबाद कडून नांदेड कडे येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असल्याने या रस्त्यावर नेहमीच वाहतुकीची मोठी वर्दळ असते.त्यातच
वाहनधारकांना देगलुर शहरात दाखल होण्यासाठी मदनुर नाक्या पासून वळण घ्यावे लागते. मात्र या ठिकाणी सर्कल नसल्यामुळे अनेकदा समोरून येणाऱ्या वाहनांसोबत समोरा समोर धडक होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असुन यामध्ये अनेकांना आपला जीवही गमवावा लागला होता.
याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते धनाजी जोशी यांनी 12 ऑगस्ट २०२४ रोजी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, देगलूर यांना निवेदन देऊन अपघाताचे स्थळ बनत असलेल्या शहरातील मदनुर नाका चौरस्त्यावर तात्काळ गोल सर्कल उभारून होणारे अपघात टाळावे अन्यथा कायदेशीर मार्गाने उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल अशा आशयाचे निवेदन दिले होते.
या निवेदनाची दखल घेऊन मदनुर नाका येथे सर्कल उभारण्याबाबत तात्काळ अंदाजपत्रक तयार करून तो मंजुरीस्तव वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात आला असून मंजुरी प्राप्त होताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल. असे लेखी पत्र १३ मार्च २०२५ रोजी उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, नायगाव यांनी काढले होते.
मात्र अद्यापही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्य शैलीबद्दल
वाहनधारकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.






