आशाताई बच्छाव
मुखेडमध्ये दुचाकीच्या डिक्कीतून ७.७० लाखांची रोकड लंपास!
भरदिवसा बँकेसमोर चोरी; शहरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
मुखेड : शहरातील नांदेड मर्चंट बँकेसमोर उभी केलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून तब्बल सात लाख सत्तर हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली.भरदिवसा बँकेसमोर चोरी; शहरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे.
ही घटना मंगळवारी (ता. १८) सकाळी साडेअकरा वाजता घडली. याप्रकरणी मुखेड पोलिस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोकनगर येथील देविप्रसाद संभाजी वडजे (२८) यांनी आपल्या दुचाकी (एमएच २६ ए ६७९६) वरून एसबीआय बँकेतून ७.७० लाख रुपये काढले. ही रक्कम शंभर आणि दोनशेच्या नोटांमध्ये असल्याने त्यात पाचशेच्या नोटांची अदलाबदल करता येते का, हे पाहण्यासाठी त्यांनी नांदेड मर्चंट बँकेकडे भेट दिली.
बँकेसमोर दुचाकी उभी करून वडजे बँकेत गेले असता, डिक्कीत ठेवलेली रक्कम दोन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. काही वेळात वडजे बाहेर आले तेव्हा त्यांना चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यांनी तत्काळ मुखेड पोलिस ठाण्यात संपर्क साधला.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात दोन अज्ञात चोरटे दुचाकीजवळ येऊन डिक्की उघडून रोकड घेऊन निघून जाताना दिसून आले.
या प्रकरणी कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक लक्ष्मणराव केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंचक फड, प्रदीप शिंदे, रवींद्र घुले, अमोल सुंडगे आणि सुनील राठोड तपास करत आहेत.
दरम्यान, भरदिवसा बँकेसमोरून इतकी मोठी रक्कम चोरीस जाण्याच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी अधिक दक्षता घेण्याची मागणी होत आहे.