आशाताई बच्छाव
आनंदाची प्राप्ती हिच खरी यशप्राप्ती
मनुष्य जीवन जगत असताना तो नेहमी सुखाचीच अपेक्षा करत असतो परंतु सुख आणि दुःख या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू असून सुखानंतर दुःख आणि दुःखा नंतर सुख हे निसर्गाचे चक्र आहे. कमी जास्त प्रमाणात सुख- दुःख व्यक्तीच्या पूर्व संचितावर अवलंबून असते. त्याचप्रमाणे मन स्वास्थ्यासाठी अंतरात्म्याला शांती मिळणे अत्यंत जरुरीचे असते, कारण त्यातच खरा आनंद असतो. आपल्या दैनंदिन गरजा भागवताना आपण केवळ शरीराचाच विचार करत असतो. अन्न, वस्त्र, निवारा ह्या तीनही गरजा खरे तर आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये या मूलभूत गरजा अत्यंत महत्त्वाच्या असून त्या गरजांची पूर्तता करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती धडपडत असतो. आपल्याला त्या व्यतिरिक्त अजून एका गोष्टीची गरज असते, ती म्हणजे शांतीची. आपल्या अंतर्मनाला, अंतरात्म्याला शांती मिळणे मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक असते. आपल्या दैनंदिन गरजांची पूर्तता करण्याच्या धावपळीत आपण आपली मुलभूत गरजच विसरून जातो, त्याची जाणीवच आपल्याला होत नाही. आपल्या जीवनातील सार कशात आहे, हे आपण स्वतःच शोधून काढायचे असते. त्याच्यासाठी आपल्या अंतरात्म्याचा शोध घेण्याची, त्याला समजून घेण्याची, त्याचा यथायोग्य विचार करण्याची जरुरी असल्याची आपल्याला जाणीव असलीच पाहिजे. आनंदाची प्राप्ती होण्यासाठी प्रत्येक व्यक्ती मार्ग शोधत असतो कारण
आनंदाची गोडी अवीट असते, त्यामुळे आनंद प्राप्तीचा कधीच वीट येत नाही.आनंदाची प्राप्ती करण्यासाठी आपले सकारात्मक विचार, आपले दैनंदिन वर्तन, दैनंदिन व्यवहार सुलभ व चांगल्या पद्धतीचे असणे गरजेचे आहे. यावरच ख-या अर्थाने सकारात्मक वातावरणाची निर्मिती होऊ शकते. आनंदाची निर्मिती आपल्याच अंतरंगांत करावी लागत असते. आनंद प्राप्ती म्हणजेच खरी यशप्राप्ती असते; हे ज्या व्यक्तीला समजते, त्याच व्यक्तीला त्याच्या जीवनातील सार कशात आहे, हेही कळू शकते. आपल्या मनात येत असलेल्या प्रत्येक विचाराचा परिणाम कमी अधिक प्रमाणांत आपल्या मानसिकतेवर होत असतो. नकारात्मक विचारांचा विपरीत परिणाम होत असतो, तर सकारात्मक विचार यश प्राप्तीसाठी उपयुक्त ठरतात. दैनंदिन धावपळीच्या व स्पर्धेचे युगामध्ये आपले सकारात्मक विचार कितपत योग्य आहे याचाही सारासार विचार होणे गरजेचे आहे. आनंद प्राप्तीसाठी सकारात्मक विचारांचा माध्यम म्हणून उपयोग करण्याची आपल्याला सतत जाणीव होणे आवश्यक असते.
रामभाऊ आवारे
राज्य प्रसिद्धीप्रमुख- युवा मराठा महासंघ






