आशाताई बच्छाव
धाकलगावात शंकरपटाचा थरार! बैलगाड्यांच्या वेगवान दौडीने प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध
अंबड/ जालना (प्रतिनिधी दिलीप बोंडे): तालुक्यातील धाकलगाव येथे आयोजित भव्य आणि जंगी शंकरपट बुधवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ढोल-ताशांच्या दणदणाटात अनेक बैलजोड्यांनी या रोमांचक शर्यतीत भाग घेतला, उपस्थित हजारो प्रेक्षकांना वेगळ्याच थराराचा अनुभव या स्पर्धेतून अनुभवता आला. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनीच या पारंपरिक खेळाचा आनंद लुटला. नागेवाडी येथील भास्कर एखंडे यांच्या पिंट्या -शंभू या बैलजोडीने ५ सेकंदात शर्यतीचे अंतर पार करून प्रथम विजेत्याचा मान पटकावला. तर रामनगर येथील रुबाब – गारुडा या बैल्जोडीने ५ .६३ सेकंदात मैदान मारत दुसरा क्रमांक मिळवला. तर तिसरा क्रमांक धाकलगाव येथील कैलास गाढे यांच्या सत्यम – शंकर जोडीने मिळवला.
या शंकरपट स्पर्धेसाठी धाकलगाव आणि आसपासच्या गावांतील शेतकऱ्यांनी आपल्या उत्कृष्ट आणि वेगवान बैलजोड्या सज्ज केल्या होत्या. बैलांना आकर्षक रंगांनी सजवण्यात आले होते आणि त्यांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज वातावरणात एक विशेष उत्साह निर्माण करत होता. शर्यतीच्या सुरुवातीपासूनच बैलजोड्यांनी वेग धरला आणि धुरळ्याच्या वादळात आपली वेगळी ओळख निर्माण केली. या स्पर्धेत अनेक रोमांचक आणि चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. काही बैलजोड्यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली, तर काहींनी शेवटच्या क्षणी बाजी मारली. प्रेक्षक प्रत्येक क्षणाचा आनंद घेत होते आणि आपल्या आवडत्या बैलजोडीला जोरदार प्रोत्साहन देत होते. शर्यतीच्या मार्गावर उभे असलेले नागरिक टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून मल्लांचे आणि त्यांच्या बैलांचे मनोबल वाढवत होते.