आशाताई बच्छाव
‘भारत रत्नांचे प्रेरक जीवनकार्याचा परिचय व अभिवादन मालिका’ या अभिनव उपक्रमाने गोविंदराव देवकर विद्यालयात स्फूर्तीची नवी उधळण
(विरदेल प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)
विरदेल (ता. शिंदखेडा) येथील ख्यातनाम श्रीमंत गोविंदराव संपतराव देवकर विद्यालय हे शिक्षण, संस्कार आणि नवोन्मेषासाठी ओळखले जाते. या विद्यालयातील ज्येष्ठ उपक्रमशील शिक्षक, सांस्कृतिक विभाग प्रमुख रवींद्र ठाकूर सर यांनी पुन्हा एकदा एक आगळावेगळा, विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि कृतज्ञतेची भावना जागवणारा उपक्रम सुरू केला आहे.
‘भारत रत्नांचे प्रेरक जीवनकार्याचा परिचय व अभिवादन मालिका’ या नावाने सुरू झालेल्या या उपक्रमाचा उद्देश – भारतरत्न सन्मान प्राप्त थोर विभूतींच्या प्रेरक जीवनगाथांचा परिचय करून देणे, त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवणे – असा अत्यंत उदात्त आहे.
या मालिकेस मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या जन्मोत्सवाच्या शुभ पर्वावर अत्यंत भक्तिपूर्वक सुरुवात करण्यात आली. दररोज एक भारतरत्न सन्मान प्राप्त विभूतींच्या जीवनकार्यावर आधारित सुमारे दोन ते तीन मिनिटांचा, कलात्मक आणि प्रभावी व्हिडिओ रवींद्र ठाकूर सर स्वतः तयार करून सोशल मीडियावर प्रसारित करीत आहेत. हे व्हिडिओ दृक-श्राव्य माध्यमांचा प्रभावी वापर करून सादर केले जात असून त्यामध्ये जीवनमूल्ये, समर्पण, देशसेवा, संशोधन, कलेचा उत्कर्ष, विज्ञानातील प्रगती यांचा सुरेख समन्वय आहे.
आतापर्यंत भारतरत्न पुरस्कार प्राप्त ५३ विभूतींच्या प्रेरणादायी कार्यावर आधारित ५३ वेगवेगळ्या व्हिडिओंची निर्मिती करून ती विद्यार्थ्यांपासून ते पालक, शिक्षक आणि सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आली आहेत. या उपक्रमामुळे विद्यालयाचा लौकिक केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे तर सोशल मीडियावरही तेजस्वीपणे झळकू लागला आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थी वर्गात राष्ट्रनिष्ठा, आदर्श जीवनमूल्ये आणि प्रेरणा यांची जाणीव निर्माण होत आहे. पालक वर्ग, शिक्षक, तसेच ग्रामस्थांकडून या उपक्रमाचे कौतुक होत असून रवींद्र ठाकूर सर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
विद्यालयाचे अध्यक्ष श्री. एस. बी. देवकर, सचिव ॲड. देवकर, मुख्याध्यापक पाटील सर, पर्यवेक्षक एस. एस. गोसावी सर तसेच सर्व शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी यांनी या उपक्रमाचे भरभरून स्वागत केले असून यासारख्या उपक्रमांची शाळेतील समृद्ध परंपरेशी सांगड घालून पुढील वाटचालीस प्रेरणा दिली आहे.
रवींद्र ठाकूर सर हे पूर्वीही विविध सांस्कृतिक व राष्ट्रीय महत्त्वाच्या उपक्रमांचे यशस्वी आयोजन करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहिले आहेत. त्यांच्या सृजनशीलतेला, कार्यक्षमतेला आणि राष्ट्रनिष्ठ दृष्टीकोनाला सलाम!






