आशाताई बच्छाव
लातूर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्याकडून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न, थोडक्यात बचावले
बी.जी.शिंदे, लातूर जिल्हा प्रतिनिधी
लातूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली. परंतु, ते सुदैवाने यामधून बचावले. त्यांच्यावर सध्या लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लातूर शहर रात्री उशिरा झालेल्या घटनेमुळे हादरुन गेले आहे.
बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःच्या घरात त्यांनी डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गोळीचा आवाज झाल्याने घरातील इतर सदस्यांनी त्यांच्या रुमकडे धाव घेतली. तात्काळ त्यांना लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू झाले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. बाबासाहेब मनोहरे यांनी पिस्तुलमधून गोळी झाडल्यानंतर डोक्याच्या उजव्या बाजूने गोळी आरपार गेली. त्यामुळे लगेच रक्तस्राव सुरु झाला.
बाबासाहेब मनोहरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. उपचाराला ते प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती सह्याद्री हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर हनुमंत किनीकर यांनी दिली आहे.
बाबासाहेब मनोहरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न कशासाठी केला?
आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न का केला, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध होत नाही. नेहमीप्रमाणे घरच्यांशी बोलत ते जेवले. जेवण झाल्यावर ते स्वतःच्या रूमकडे गेले. काही वेळानंतर त्यांच्या रुममधून गोळी झाडल्याचा आवाज आला. त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न त्यांनी का केला? काही ताणतणाव होता का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
या घटनेनंतर लातूर महानगरपालिकेतील अनेक वरिष्ठ अधिकारी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. घटनेची माहिती मिळताच लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, तसेच अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळाकडे आणि हॉस्पिटलकडे धाव घेतली. महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये जाता आयुक्तांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली होती. भाजप नेत्या डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे अनेक माजी नगरसेवक यांनी हॉस्पिटलला भेट देत बाबासाहेब मनोहरे यांच्या प्रकृतीबाबत जाणून घेतले.
बाबासाहेब मनोहरे यांनी मराठवाड्यातील धाराशिव, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये काम केले आहे. नांदेड येथे त्यांनी अतिरिक्त मनपा आयुक्त म्हणून कार्यभार सांभाळला होता. त्यानंतर लातूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. अतिशय स्पष्टवक्ते असलेल्या आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल का उचलावे, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. सध्या लातूर पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरु आहे. बाबासाहेब मनोहरे हे पूर्वी लातूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त होते. त्यांना बढती मिळून ते पालिकेचे आयुक्त झाले होते.