
आशाताई बच्छाव
महापालिकेच्या अग्निशमन दलात आणखी एक नवे वाहन दाखल अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी
शासनाच्या माध्यमातून महापालिकेच्या अग्निशमन दलात आणखी एक नवे वाहन दाखल झाले आहे. आग, अपघात, इमारत कोसळणे अशा घटनांमध्ये तत्काळ मदत पोहचवण्यासाठी सर्व सुविधायुक्त असलेले शीघ्र प्रतिसाद वाहन आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी, नागरिकांना वाचवण्यासाठी या वाहनाचा उपयोग होईल, असे मत आयुक्त यशवंत डांगे यांनी व्यक्त केली
पालकमंत्री विखे व आमदार जगताप यांच्या हस्ते या वाहनाचे लोकार्पण
दरम्यान, विधिमंडळाच्या अधिवेशनात अहिल्यानगर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या बळकटीकरणासाठी आमदार संग्राम जगताप यांनी सरकारचे लक्ष वेधले होते. सरकारने त्याची दखल घेतली आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे व आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते या वाहनाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आयुक्त यशवंत डांगे हे बोलत होते.
आधुनिक शीघ्र प्रतिसाद वाहन २० फूट लांबीचे असून, आपत्कालीन परिस्थितीत त्वरित घटनास्थळी पोहोचण्यासाठी त्याची रचना करण्यात आली आहे. वाहनात प्राथमिक उपचार, स्ट्रेचर उपलब्ध आहेत. आगीवर जलद नियंत्रण मिळवण्यासाठी ३०० लिटर पाण्याची व ३० लिटर फोमची क्षमता आहे. इमारत कोसळल्यास किंवा एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत, अपघातस्थळी मदत कार्यासाठी, बचाव कार्यासाठी आपत्कालीन टूल बॉक्स, लाईफ जॅकेट, वूड कटर आदी साहित्य सामग्री उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत पोहचवण्यासाठी या वाहनाचा उपयोग होईल, असे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.
शहराचा विस्तार वाढत असल्याने अग्निशमन सेवा बळकट करण्याची गरज आहे. राज्य शासनाचे या विषयाकडे लक्ष वेधल्यावर एक वाहन तत्काळ उपलब्ध झाले आहे. अग्निशमन दलात वाहनांची संख्या वाढवण्यासाठी व अग्निशमन केंद्रांची उभारणी करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन विभागाकडे पाठपुरावा सुरु आहे, असे आमदार संग्राम जगताप यांनी म्हटले आहे.