आशाताई बच्छाव
त्रिलिंगी महादेव मंदिर सोनई,नेवासा,अहिल्यानगर, कारभारी गव्हाणे प्रतिनिधी
मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ व चक्रधर स्वामी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या नेवासा तालुक्यातील सोनई गाव हे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते.
स्री राज्यातून आल्यावर मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ सोनई येथे थांबले व सोबत असलेल्या सोन्याच्या विटापैकी एक सोन्याची वीट गोरक्षनाथांनी या गावात टाकली असे सांगितले जाते.तेव्हापासून या गावाचे नाव ‘सोनई’ असे झाले.
गावातच आपल्याला हे पुरातन त्रिलिंगी महादेव मंदिर पाहायला मिळते.या मंदिराची बांधणी साधारण दहाव्या ते तेराव्या शतकात झालेली दिसून येते. हे मंदिर हेमाडपंथी शैलीचे आहे .या मंदिराच्या ठिकाणीच गोरक्षनाथ यांनी सोन्याची वीट टाकल्याचे चे सांगितले जाते तर मंदिराच्या आवारात असलेल्या गुफेत तीन दिवस थांबून तपश्चर्या केल्याचे सांगितले जाते. मंदिरात प्रवेश करताना आपल्याला प्राचीन रंग दिलेला नंदी दिसतो,मंदिराच्या प्रवेश द्वारावर दोन-तीन वीरगळी दिसतात.त्यांनाही रंग दिलेला आहे.त्यात एका वीरगळी वर आपल्याला तीन लिंग असणारी कोरलेली महादेव पिंड दिसते.
याच मंदिरात चक्रधर स्वामी यांनी महानुभाव पंथाचा प्रसार करताना थांबले असल्याचे कळते. मंदिराच्या सभामंडपात त्यांचे आसन आजही आपल्याला बघायला मिळते .
हे मंदिर पूर्वाभिमुख असून मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. मंदिराला रंगरंगोटी केलेली आहे ,त्यामुळे मंदिराचे प्राचीनत्व गेल्याचे दिसून येते आणि दगडी खांबावर केलेल्या कोरीव नक्षीकाम स्पष्ट दिसत नाही हि खूप वाईट गोष्ट आहे ,तसेच मंदिराचा कळस हा पडलेला होता पण तो आता नव्याने बांधण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. मंदिराचा सभामंडप खुला असून अशा सभामंडपाला ‘रंगमंडप’ असे म्हणतात. या सभामंडपात अनेक कोरीव खांब आहेत ,त्या खांबावर आपल्या ला श्री कृष्ण बासुरी वाजवताना दिसतात व त्यावजवळ वासरू आणि नाग पण दिसतो ,त्यात एका खांबावर भगवान ब्रम्हा विष्णू महेश कोरलेले आहे.आपल्याला काही खांबावर गणपती आणि कीर्ती मुखही दिसतात.सभामंडपातील स्तंभावर विविध शिल्पांकने असून संपूर्ण मंदिराच्या केवळ स्तंभावर शिल्पांकन केलेले आपल्याला दिसून येते. मुख्य गाभाऱ्यात त्रिमुखी किंवा तीन लिंगी शिवाची पिंड आपल्याला बघायला मिळते.गाभाऱ्याच्या मध्यभागी तीन लिंगाची पिंड आहे. या तीनही लिंगाना ब्रह्मा-विष्णु-महेश असे म्हटले जाते. यामुळे या मंदिराची ओळख त्रिलिंगी महादेव अशी प्रचलित झाली आहे,
त्रिलिंगी महादेव मंदिर हे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने अप्रतिम असा नमुना आहे.मंदिराच्या सभामंडपाचे छत बारा दगडी गाळ्यापासून बनवलेले असून मंडपात 24 स्तंभ खांब आहे. मंदिराच्या खांबावर उतृष्ठ असे मूर्तिकाम आणि नक्षीकामही मनमोहक आहे.
मंदिराचा नकाशा, बांधणी पद्धत, स्तंभ, शिल्प, आयताकृती आहे. काळ्या दगडाच्या चौथाऱ्यावर हे मंदिर उभे आहे.मंदिराच्या मागील बाजूस गेल्यावर या मंदिराची उंची आपल्याला समजून येते.मंदिराचे तोंड पूर्वेला असून नंदीचे तोंड पश्चिमेला आहे. मूर्ती गाभारा व सभामंडप असे मंदिराचे दोन भाग आहेत,
आपल्याला शनी शिंगणापूर ला सोनई वरून जावे लागते .
हे मंदिर रस्त्यालगत असूनही आजपर्यंत प्रकाश झोतात आलेले नाही,गावातील च मंडळी येथे भेट देतात.या मंदिराच्या आजू बाजूस शांताता आहे.मंदिरा शेजारी सोमेश्वर महादेव मंदिर दत्त मंदिर आणि गोरक्षनाथ मंदिरही आहे.या मंदिराला भेट द्यायची असल्यास सोनई गाव गाठावे गावातून बेल्हेकर वाडी ला रोड जातो.तेथून आत गेल्यावर आपल्याला हे मंदिर नजरेस पडते या मंदिरा सोबतच आपण गावात असणारा सरदार बाणाजी शेटे यांचा वाडा ,प्राचीन बारव व बारवे पुढे असणारी बानाजी शेटे यांची समाधी बघू शकतो आणि शनी शिंगणापूर जवळ असल्याने तेथेही जाऊ शकतो , आपण शनी शिंगणापूर ला आल्यास या मंदिराला नक्की भेट द्यावी.






