आशाताई बच्छाव
सरकारी व खाजगी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेर्याअभावी विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात !
नियमित स्वच्छतेअभावी प्रसाधनगृहाची दुर्दशा; मनविसेने उठविला आवाज
वाशिम, गोपाल तिवारी ब्युरो चीफ- जिल्हयातील अनेक सरकारी व खाजगी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेर्याचा अभाव, प्रसाधनगृहाच्या नियमित स्वच्छतेकडे शाळा प्रशासनाचे दुर्लक्ष, स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी आरओ फिल्टरची अनुपलब्धता, प्रवेशव्दारावर चौकीदाराची गैरहजेरी आदी अनेक कारणामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांचा जिव धोक्यात आला असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी निगडीत असलेल्या या सर्व बाबीची पुर्तता करा अन्यथा तीव्र आंदोलन उभारु असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने दिला आहे. मनविसेचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन कढणे यांच्या नेतृत्वात तसेच मनसे जिल्हाध्यक्ष राजु किडसे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे, मनसे शहराध्यक्ष रवि वानखेडे, वाहतूक शहराध्यक्ष उमेश टोलमारे आदींच्या उपस्थितीत गुरुवार, २६ डिसेंबर रोजी जि.प. शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद आहे की, जिल्हयातील अनेक सरकारी व खाजगी शाळांमध्ये शासनाने दिलेल्या निर्देशानुसार विविध उपाययोजनांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न प्रलंबित आहे. अनेक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी आरओ फिल्टर नाहीत. अनेक शाळांमध्ये मुले व मुलींसाठी वेगवेगळे प्रसाधनगृह व मुत्रीघरे नाहीत. ज्या शाळांमध्ये आहेत त्याठिकाणी या मुत्रीघरांची नियमित स्वच्छता ठेवली जात नाही. या त्रासाचा विद्यार्थ्यांना सामना करावा लागत आहे. जिल्हयातील अनेेक शाळा गर्दीच्या ठिकाणी असल्यामुळे शाळा भरतांना व सुटतांना विद्यार्थ्यांना जिवघेण्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी या शाळांमधील प्रवेशव्दारावर चौकीदार किंवा सुरक्षा रक्षक ठेवण्याची नितांत गरज आहे. शाळांमध्ये चौकीदार नसल्यास शाळांमधील विद्यार्थी, विद्यार्थीनी कधी शाळेत येतात व कधी शाळेत जातात ही बाब शाळा प्रशासनाला सुद्धा माहिती नसते. या बाबीवर अंकुश ठेवण्यासाठी चौकीदाराजवळ हजेरी नोंदवही ठेवण्यासह शाळांच्या दर्शनी भागात सुचना लावणे आवश्यक आहे. या सर्व समस्येमुळे सरकारी व खाजगी शाळांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थी विद्यार्थीनींची सुरक्षा धोक्यात आली आहे. या बाबीची त्वरीत पुर्तता न केल्यास मनसे विद्यार्थी सेना रस्त्यावर उतरेल असा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.






