आशाताई बच्छाव
लालफितीच्या कारभारामुळे रस्त्याच्या कामाला खीळ; ठेकेदार आक्रमक
अहिल्यानगर, कारभारी गव्हाणे प्रतिनिधी
महसूल विभागाच्या धोरणामुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांना ब्रेक लागणार आहे. याबाबत ठेकेदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविसकर यांना निवेदन देत जिल्हातील रस्त्याचे कामे बंद करण्याचा इशारा दिला आहे.
महसूल विभागाच्या गौण खनिज विषयक नव्या क्लिष्ट धोरणामुळे रस्त्याच्या चालू कामांना कुठलेही गौण खनिज सहजपणे उपलब्ध होत नाही. त्यामुळे सर्व रस्त्यांची कामे बंद ठेवण्याची वेळ आली आहे. एक तर प्रत्येक रस्त्याच्या चालू कामाजवळ वा कामाच्या हद्दीत काही ठिकाणी गौण खनिजाचा मंजूर गट नाही. त्या गटात मटेरियल उपलब्ध नाही. त्यामुळे एखाद्या खासगी शेतकऱ्यांच्या शेतातून सध्या तात्पुरती रॉयल्टी भरून गौण खनिज उपलब्ध करावे तर महसूल विभाग त्यांस मान्यता देत नाही. त्यामुळे चालू रस्त्याचे काम करण्यास अडचण येत असून रस्त्यांची कामे वेळेत होत नाही.
रॉयल्टी भरूनही मुरूम उपलब्ध न झाल्याने रस्त्याची कामे नाईलाजास्तव बंद करावी लागतील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.