आशाताई बच्छाव
स्कूल बस, कार अपघातात युवक ठार
मोताळा नांदुरा मार्गावरील घटना; कारचालकावर पोलिसांकडून गुन्हा
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- मोताळा तालुका शैक्षणिक सहलीवरुन परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उभ्या स्कूल बसला भरधाव येणाऱ्या कारने जबर धडक दिली. या अपघातात बससमोर उभे राहून इंजिनमध्ये पाणी टाकणाऱ्या एका ३४ वर्षीय तरुणाला जबर मार लागल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मोताळा नांदुरा मार्गावरील विद्युत सबस्टेशनजवळ रविवारी २3 डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जामोद येथे लईक देशमुख हे खासगी शिकवणी वर्ग चालवतात. दरम्यान, काल रविवारी सकाळी ते काही विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल घेऊन एमएच २८ बी ८३७४ या
क्रमांकाच्या स्कुलबसने छत्रपती संभाजीनगर येथे गेले होते. या वेळी त्यांनी आपला मित्र तथा खासगी संस्थेवरील लिपिक मो. मुसअब अब्दुल जाबीर वय ३२ यालाही सोबत घेतले होते. रात्री उशिरा जळगाव जामोदकडे जात असताना स्कूल बसचे इंजिन गरम झाल्यामुळे त्यांनी स्कूल बस येथील विद्युत सबस्टेशन समोर थांबवली. त्यावेळी मो. मुसअब हा खाली उतरुन इंजिनमध्ये पाणी टाकत असताना भरधाव
येणाऱ्या एमएच ०३ सीएम १४७९ या क्रमांकाच्या कारने स्कूल बसला समोरून जबर धडक दिली. या अपघातात मो. मुसअब याच्या डोक्याला जबर मार लागला. जखमी अवस्थेत त्याला तत्काळ बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतु, तपासणी करून डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. कार चालक अखिलेश विजय चौधरी रा. नांदुरा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.






