आशाताई बच्छाव
नांदुऱ्यात एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी, वॉर्ड क्रमांक एकमधील घटना : चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल…
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
नांदुरा :-बुलढाणा शहरातील वॉर्ड क्रमांक एकमधील लक्ष्मीनगर भागात शुक्रवारी रात्री दोन ठिकाणी घरफोडी होऊन नगदी रकमेसह एक लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याची घटना घडली. याच दरम्यान आणखी एका घरात चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध नांदुरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत गुणवंत भाऊराव साबे (५०, रा. लक्ष्मीनगर), यांनी नांदुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यामध्ये शुक्रवारी रात्री दुचाकीचे गॅरेज बंद करून घरी झोपले. त्यावेळी अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश केला. कपाटात ठेवलेले नगदी साठ हजार रुपये, सोन्याची दहा ग्रॅमची पोत, एक अंगठी, कानातील टॉप्स चोरून नेले.
घरापासून काही अंतरावर राहणारे उमेश हरिश्चंद्र पाटील यांच्या घरातील नगदी तीन हजार रुपये सोन्याचे दागिने,असा एकूण एक लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. तसेच शेजारी राहणारे महादेव मोतीराम जाधव यांच्या घराचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले. त्यावरून नांदुरा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध कलम ३३१ (४) ३०५ (अ) ६२ भारतीय न्याय संहितानुसार (बीएनएस) गुन्हा दाखल केला. अधिक तपास नांदुरा पोलिस करीत आहेत. चोरीच्या घटनांमुळे शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.






