Yuva maratha news
वृध्द कलावंतांच्या मानधन मंजुरीच्या याद्या अडकल्या लालफितशाहीत शेकडो वृध्द कलावंतांनी जाहीर केले बेमुदत उपोषण लोकशाहीत
मानधन मंजुर झालेल्या कलावंतांच्या याद्या जाहीर करण्यास विलंब
शेकडो कलावंतांचा बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा
वाशिम – यावर्षी मार्चमध्ये सादरीकरण होवून मानधनास पात्र झालेल्या लाभार्थी वृध्द कलावंतांच्या याद्या जाहीर होवून तीन महिने लोटले मात्र अद्याप समाजकल्याण कार्यालयाकडून ह्या याद्या जाहीर करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे उतारवयात मानधनाच्या प्रतिक्षेत असलेल्या जिल्हयातील शेकडो वृध्द कलावंतांच्या मनात निराशेचे मळभ दाटून आले आहे. आपली उभी हयात लोककलेसाठी खर्ची घालणार्या ह्या वृध्द कलावंतांना जगण्यासाठी शासनाकडून मानधनाचीच एकमात्र आशा आहे. त्यामुळे सदर याद्या त्वरीत जाहीर करण्याच्या मागणीसाठी विदर्भ लोककलावंत संघटनेने बेमुदत आमरण उपोषणाची हाक दिली आहे.
संघटनेचे अध्यक्ष व महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारप्राप्त दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी अनेक कलावंतांच्या उपस्थितीत गुरुवार, २७ जून रोजी जिल्हाधिकारी तथा जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कलावंतांच्या मागण्यांचे निवेदन देवून मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या १४ ऑगष्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
निवेदनात नमूद आहे की, शासनाच्या योजनेनुसार मानधन मिळण्यासाठी जिल्हयातील शेकडो वृध्द कलावंतांनी गेल्या ६ ते ७ वर्षापासून समाजकल्याण विभागाकडे प्रस्ताव सादर केले होते. मात्र पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असणारी समितीच गठीत न झाल्यामुळे या कलावंतांचे प्रस्ताव लालफितशाहीत अधांतरी लटकले होते. या कलावंतांना न्याय मिळण्यासाठी विदर्भ लोककलावंत संघटनेच्या वतीने वेळोवेळी निवेदने देवून ही मागणी रेटून धरली होती. तसेच आंदोलनेही केली होती. याची दखल घेत समाजकल्याण विभागाच्या वतीने मार्च महिन्यात कलावंतांचे सादरीकरण करुन पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. मात्र तीन महिने लोटूनही या प्रस्तावाच्या याद्या अद्याप जाहीर करण्यात न आल्यामुळे या वृध्द कलावंतांना मानधनापासून मुकावे लागत आहे. या पाच-सहा वर्षापासून कालावधीत मानधनाच्या प्रतिक्षेत असलेल्या अनेक कलावंत मृत्यूमूखी पडले आहेत. मात्र समाजल्याण विभागाने मानधनास पात्र लाभार्थ्यांच्या याद्या अद्यापही जाहीर केल्या नाहीत. त्यामुळे अधिकार्यांकडून वृध्द कलावंतांवर हेतूपुरस्पर अन्याय होत आहे. त्यामुळे या कलावंतांच्या याद्या तात्काळ प्रसिध्द कराव्यात अन्यथा येत्या १४ ऑगष्टपासून शेकडो कलावंतांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण छेडण्यात येईल व या उपोषणादरम्यान कलावंतांच्या जिवित्वाची सर्व जबाबदारी शासनाची राहील असा निर्णाणीचा इशारा संजय कडोळे यांनी शासनाला दिला आहे.