आशाताई बच्छाव
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाला खिंडार प्रियंका बारसेंचा शरद पवार गटात प्रवेश
संजीव भांबोरे
पुणे –भोसरीतील भाजपाच्या नगरसेविका प्रियंका प्रवीण बारसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात अधिकृत प्रवेश केला. यावेळी खासदार मुप्रियाताई सुळे, माजी मंत्री आ. जितेंद्र आव्हाड, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, कार्याध्यक्ष सागर तापकीर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश घेण्यात आला.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महाराष्ट्रात बाजी मारली. या निवडणुकीत शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दहा पैकी आठ खासदार निवडून आणत महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता शरदचंद्र पवार यांच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिले. तसेच शिरूर लोकसभेत डॉ. अमोल कोल्हे यांना मिळालेल्या जनसामान्यांचा कौल लक्षात घेत पिंपरी-चिंचवड शहरातील लोकप्रतिनिधी यांचा कल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या दिशेने जाण्याचे संकेत आता मिळू लागले आहे. भोसरीतील शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या उच्चशिक्षित भाजप नगरसेविका प्रियंका बारसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे पिंपरी चिंचवड शहरात जोरदार तुतारी वाजणार हे स्पष्ट झाले आहे.
यावेळी बोलताना प्रियंका बारसे म्हणाल्या, भाजपाच्या स्थानिक नेतृत्त्वाच्या हुकूमशाही कार्यपद्धतीला कंटाळून तसेच शरद पवार यांच्या विचाराला प्रेरित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहे. भाजपामधील अजून सहकारी आमच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्यास तयार आहेत. येणाऱ्या काळात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलसाहेब, खासदार डॉ. अमोल कोल्हे साहेब यांच्या नेतृत्वात तसेच युवक अध्यक्ष इम्रान शेख आणि सहकारी यांच्या सोबतीने पिंपरी- चिंचवड शहरात जोमाने काम करणार आहे.