Home जालना एक व्यक्ति, एक झाड’ कायदा करण्याची गरज , अन्यथा शासकीय योजनांचा लाभ...

एक व्यक्ति, एक झाड’ कायदा करण्याची गरज , अन्यथा शासकीय योजनांचा लाभ नाही

133

आशाताई बच्छाव

1000424756.jpg

‘एक व्यक्ति, एक झाड’ कायदा करण्याची गरज , अन्यथा शासकीय योजनांचा लाभ नाही
जिल्हा प्रतिनिधी जालना – वसंतराव देशमुख
दिनांक 03/06/2024
‘एक व्यक्ती, एक झाड’कायदा करुन झाडांची लागवड करुन त्या झाडांचे पाच वर्षे संवर्धन करून लागवड केलेल्या वृक्षांचे संगोपन करणाऱ्या नागरिकांनाच शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावा .असा कायदाच शासनाने अमलात आणण्याची गरज निर्माण झाली आहे. जो नागरिक वृक्ष लागवड करून पाच वर्षे त्यांना जतन करणार नाहीत अशा नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात येऊ नये अशा प्रकारचा कायदा करावा तेव्हाच वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन 100% होईल आणि आज राज्यासह देशात वाढत असलेले कमालीचे तापमान व बिघडलेला निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मदत होईल. अन्यथा आगामी काही वर्षांमध्ये सृष्टीचा नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही हे 2024 च्या उन्हाची तीव्रता पाहता लक्षात येते. यावर्षीच्या तापमानाचा सरासरी विचार केला असता 50 अंश डिग्री सेल्सिअसच्या जवळपास किंवा त्याच्याही पेक्षा जास्त तापमान वाढल्यामुळे जमिनीतील पाण्याचे प्रमाणही कमी झाले.यामुळे जलस्रोत कोरडे ठाक पडले आहेत .याला बऱ्याच अंशी शासनाचे वनीकरण विभाग व अधिकारी- कर्मचारी जबाबदार आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.शासनाच्या वनीकरण विभागामार्फत दरवर्षी वृक्ष लागवड केली जाते परंतु ती वृक्ष लागवड शंभर टक्के बोगस स्वरूपाची असून केवळ शासनाच्या डोळ्यात धुळफेक करून पैशांचा अपव्यय करण्यात येत आहे. दरवर्षी खड्डा एकच परंतु पैसे मात्र नवीन त्यामुळे पाच -पाच वर्षे एकाच खड्यात वृक्ष लागवड केली गेली बिल मात्र दरवर्षी वाढलेले.अनेक वर्षापासून वनीकरण विभागामार्फत करोडो झाडांची लागवड केली जाते त्या तुलनेत जिवंत झाडांची संख्या दिसत नाही.वृक्षतोड जास्त झाली आहे. अनेक वेळा संबंधित वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वृक्षतोडीबाबत तक्रारी देऊनही त्यांनी संबंधित वृक्षतोड्याकडून चिरी-मिरी घेऊन बघ्याची भूमिका घेतल्यामुळे आज सर्वसामान्य जनतेवर ही भयावह परिस्थिती उद्भवली आहे. यासाठी संपूर्ण देशामध्ये एक व्यक्ती एक वृक्ष या समीकरणाचा अवलंब केल्यास व पाच वर्ष त्या वृक्षाचे संगोपन करून त्याचे जतन करणाऱ्या नागरिकालाच शासकीय योजनांचा लाभ द्यावा अन्यथा देण्यात येऊ नये असा कठोर कायदा जर शासनाने अमलात आणला तरच वृक्ष लागवड व संवर्धन होऊन आज जी भयावह परिस्थिती राज्यासह देशात निर्माण झालेली आहे तिला कुठेतरी सावरता येईल. अन्यथा शासनाने कोणतेच पाऊल उचलले नाही तर आगामी काळामध्ये फार मोठे संकट भयावह परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी ही निसर्गाची धोक्याची घंटा असून देशातील राजकीय पक्षांनी व नागरिकांनी आपली वैयक्तिक जबाबदारी म्हणून ती स्वीकारावी आणि प्रत्येकाने ‘एक व्यक्ती एक वृक्ष’ लागवड करुन पाच वर्षे त्याचे संवर्धन करावे म्हणजे येणाऱ्या पिढीला भविष्यातील संभाव्य धोक्यापासून वाचविण्यास काही अंशी का होईना मदत होईल.यासाठी राज्यातील तसेच देशातील होत असलेली वृक्षतोड बंद करावी तसेच कोठेही वृक्षतोड होत असेल त्यास प्रत्येक नागरिकाने विरोध करावा आणि संबंधित वृक्षतोड करणाऱ्या विरुद्ध मनुष्य वधाचा गुन्ह्या नोंद करुन कठोर शिक्षची तरतूद करण्यात यावी तसा कायदा शासनाने अमलात आणण्याची गरज निर्माण झाली आहे.यासोबतच कठोर कायदा करण्याचीही गरज आहे.