आशाताई बच्छाव
संवाद
आधुनिक काळात संवादाचे महत्त्व संपत चालले आहे.हल्ली लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधतात.त्यामुळे एकमेकांना भेटणे,प्रत्यक्ष संवाद साधताना होणारा आनंद याचे प्रमाण कमी झाले आहे.दोन किंवा त्याहून अधिक व्यक्ती एकमेकांना भेटल्या की आचारविचारांची देवाणघेवाण होते,एकमेकांचे विचार कळल्यामुळे विविध विषयांवर माहिती आणि मार्गदर्शन मिळतं.प्रत्यक्ष संवादातून मिळणारा आनंद सोशल मिडियावर नाही मिळू शकत.जे लोक उत्तम पध्दतीने संवाद साधतात,ते आपल्या कार्यात खूप पुढे जातात.जेव्हा एकमेकांशी संवाद साधला जातो तेव्हा कधी-कधी काही विशिष्ट विषयाला धरून तो असतो.तर कधी संवादाचा विशिष्ट विषय असतोच असे नाही.त्यांच्यात कित्येक विषयांवर संवाद साधला जातो.संवाद कौशल्य हा प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा अपरिहार्य पैलू आहे.संवाद करणा-या व्यक्ती सारख्याच वयोगटातील असतात असेही नाही किंवा त्यांचे लिंग समान असावे असेही काही नाही.कधीकधी विशिष्ट विषयावर विशिष्ट निर्णय घेण्यासाठी बोलणे म्हणजेही संवाद असतो.ज्या दोन व्यक्तींना संवाद साधायचा आहे त्यांची सांस्कृतिक पार्श्वभूमी एकच असल्यास संवाद उत्तमरित्या होतो.माणसाच्या जीवनात संवादाला खूप महत्त्व आहे.संवादाशिवाय राहणे शक्य नाही.एकमेकांशी संवाद होणे खूप गरजेचे आहे.
जेव्हा व्यक्ती स्वतःशी संवाद साधते तेव्हा त्या संवादाला आत्मसंवाद म्हणण्यात येतं.म्हणजेच त्या व्यक्तीच्या मनात येणा-या विचारांना तिच व्यक्ती उत्तर देत असते.स्वत:च वक्ता आणि श्रोता अशी दुहेरी भूमिका ती व्यक्ती आत्मसंवादात पार पाडत असते.याला एकतर्फी संवादही म्हणता येईल.संवाद जेव्हा दोन व्यक्तींमध्ये साधल्या जातो तेव्हा त्याला द्विव्यक्तीय संवाद म्हटले जाते.दोन व्यक्तींमधे हा संवाद थेट साधल्या जातो.हा संवाद दोघांमध्ये निकटता निर्माण करणारा असतो.जेव्हा दोनपेक्षा अधिक व्यक्ती संवादात सामिल होतात तेव्हा त्याला समूह संवाद म्हटले जाते.यात श्रोता आणि संप्रेरक यांच्यात थेट संवाद साधल्या जातो.म्हणजेच हा जनसंवाद आहे.
सर्वांना पैसा आणि भौतिक सुखसुविधांची चटक लागलेली आहे.हल्ली एकमेकांविषयी माया, प्रेम या गोष्टींना फारसा वाव राहिला नाही.पैसा मिळविण्यात आजचा माणूस गुरफटत जातो आहे.त्यामुळे सहाजिकच माणसाचे जीवन भकास, नीरस झाले आहे.हल्ली संवेदनशीलता फारशी उरलेली नाही.एक कृत्रिमपणा माणसाच्या वागण्यात,बोलण्यात दिसून येतो.माणसाचे खरे जीवन भावनेमध्ये आहे आणि त्यासाठी संवाद अतिशय महत्त्वाचा आहे.जर संवाद साधला नाही तर एकमेकांविषयी कुठलीच भावना निर्माण होणार नाही आणि त्यामुळे माणसाच्या जीवनातील जिवंतपणा हळूहळू नष्ट होईल.संवादाविना माणसाचे जीवन निरूपयोगी आहे.संवादाचा प्रभाव आपल्या कौटुंबिक आणि सामाजिक जीवनावर देखील होत असतो.हल्ली तर काही लोक घरातील मंडळींशी सुध्दा संवाद साधणे टाळतात.घरात जर वृध्द असतील तर त्यांच्याशी फारसे कुणी बोलत नाही.काही तरूण मंडळी तर वृध्दांना काहीच समजत नाही अश्या अविर्भावात वावरत असतात.घरातील नाती यामुळे संपत चालली आहेत.लहान मुले,मोठी माणसे मोबाईल, लॅपटॉप, काॅम्पुटरवर वेळ घालवतात.अश्याने संवाद कसा होणार?सर्व गरजा पैशाने भागवल्या जाऊ शकत नाही.जीवनात एकमेकांच्या आधाराची, नात्यांमध्ये ओलाव्याची अत्यंत गरज असते.त्यासाठी एकमेकांशी संवाद हवा.संवेदनशील संवाद असेल तर मानवी मने पुन्हा जिवंत होतील.प्रत्येकाला आपले विचार दुसऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी संवाद खूप जरूरी आहे.संवादामुळे नाती जवळ येतात.संवाद संपला तर संपूर्ण जग अबोल होईल.संवाद नात्यांमध्ये प्राणवायू प्रमाणे काम करतो.नातं जपण्यासाठी जशी एकमेकांवर विश्वास असण्याची गरज आहे, तसेच विश्वास टिकवण्यासाठी संवाद गरजेचा आहे.संवादातूनच नातं बहरत असतं.
जेव्हा सोशल मिडियाचा काळ नव्हता तेव्हा माणसे पत्राच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष भेटून एकमेकांशी संवाद साधत असत.आताच्या आधुनिक काळात संवादाची बरीच साधने उपलब्ध झाली आहेत.पण एकमेकांच्या सान्निध्यात येऊन होणारा संवाद आणि त्यामुळे निर्माण होणारी आत्मियता कुठेतरी कमी झाल्याची जाणीव होते.संवाद एक कला आहे.समोरच्या व्यक्तीशी बोलत असताना मनात आणि शब्दांत प्रेम, आपलेपणा असला की प्रत्येक शब्द संवाद ठरत असतो.व्यक्तीने संवादाच्या माध्यमातून सुसंवाद करावा.संवादाचे महत्त्व जितके सांगावे तितके कमीच आहे.
लैलेशा भुरे
नागपूर