Home नांदेड द. ग. तटकरे यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त तळे येथे परिसंवाद संपन्न

द. ग. तटकरे यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त तळे येथे परिसंवाद संपन्न

168

आशाताई बच्छाव

IMG-20221204-WA0027.jpg

द. ग. तटकरे यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त तळे येथे परिसंवाद संपन्न
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
तळा : तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व विद्याशाखांच्या वतीने दिनांक ३ डिसेंबर २०२२ रोजी नवीन शैक्षणिक धोरण व त्याचे प्रचलित शिक्षण पद्धतीवरील प्रभाव या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव मंगेश देशमुख यांची उपस्थिती होती. या परिसंवादात प्रा.पाटील एन सी यांनी नवीन शैक्षणिक धोरणाचे तात्विक अधिष्ठान व मूलभूत वैशिष्ट्य याची मांडणी केली. प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सचिन भाटे यांनी नवीन शैक्षणिक धोरणाचे प्राथमिक विभागावरील प्रभावाचे विश्लेषण केले. गो.म.वेदक विद्यामंदिरचे सहाय्यक शिक्षक सुहास वावेकर यांनी माध्यमिक विभागावरील नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावाची मांडणी केली. डॉ.नानासाहेब यादव यांनी नवीन शैक्षणिक धोरणामुळे उच्च शिक्षण कसे आमूलाग्र बदलणार आहे याची मांडणी केली. या परिसंवादाचे प्रास्ताविक द. ग. तटकरे महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ भगवान लोखंडे यांनी केले. या परिसंवादात चर्चेत सहभागी होताना प्राथमिक विभागाचे चेअरमन किरण देशमुख यांनी अमेरिकेतील आपले अनुभव मांडत नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणी साठी विद्यार्थी, शिक्षक व संस्था पदाधिकारी यांनी अधिक जबाबदारीने व शिस्तबद्ध पद्धतीने सकारात्मक प्रतिसाद देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी डॉ. दिवाकर कदम, रोहित भागवत, विनोद महाजन आदी उपस्थितांनी यासंदर्भातील चर्चेत सहभाग घेतला. परिसंवादाच्या अध्यक्षीय भाषणात मंगेश देशमुख यांनी आपल्या सिंगापूर येथील वास्तव्यात आलेल्या अनुभवांचे संदर्भ देऊन तेथील नागरिकांसारखा समर्पित भाव ठेवून शिक्षक व संस्था पदाधिकारी यांनी कार्य केले तरच नवीन शैक्षणिक धोरण प्रभावी पद्धतीने अंमलात येऊ शकते. संस्था पदाधिकारी म्हणून नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने आपण स्वतः सकारात्मक प्रतिसादची तयारी ठेवावी असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे आभार विद्या प्रबोधिनी या उपक्रमाचे समन्वयक डॉ नवनाथ गायकवाड यांनी केले तर नियोजन मितेष मूळे व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी उत्तम रीतीने पार पाडले. या परिसंवाद कार्यक्रमासाठी संस्थेचे विश्वस्त मारुती शिर्के गुरुजी व शालेय समितीचे सदस्य चंद्रकांत खातू यांच्यासह वरिष्ठ, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक, गो म वेदक विद्यालय व प्राथमिक विभागाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.