Home नांदेड भारत जोडो यात्रा आज महाराष्ट्रात, देगलूरमध्ये राहुल गांधी काढणार मशाल रॅली; प्रदेश...

भारत जोडो यात्रा आज महाराष्ट्रात, देगलूरमध्ये राहुल गांधी काढणार मशाल रॅली; प्रदेश काँग्रेसकडून जय्यत तयारी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह ज्येष्ठ नेते नांदेड जिल्ह्यात तळ ठोकून.

41
0

आशाताई बच्छाव

IMG-20221108-WA0010.jpg

भारत जोडो यात्रा आज महाराष्ट्रात, देगलूरमध्ये राहुल गांधी काढणार मशाल रॅली; प्रदेश काँग्रेसकडून जय्यत तयारी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह ज्येष्ठ नेते नांदेड जिल्ह्यात तळ ठोकून.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार ( युवा मराठा न्यूज नेटवर्क)

देगलूर:काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या
नेतृत्वाखाली कन्याकुमारीपासून सुरु झालेली भारत जोडो यात्रा आज संध्याकाळी नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून महाराष्ट्रात दाखल होत आहे. आज सोमवारी (दि. ७) रात्री ७.३० वाजता यात्रेच्या स्वागतासाठी प्रदेश काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसह राज्यभरातील सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह समर्थक तयारीत आहेत.
विशेष म्हणजे भारत जोडो यात्रेत राहुल गांधी हे पहिल्यांदाच सोमवारी रात्री देगलूर ते वन्नाळी अशी मशाल यात्रा काढणार आहेत. दि. ८ नोव्हेंबर रोजी शीख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानक देवजी यांची जयंती आहे. त्याप्रित्यर्थ राहुल गांधी हे रात्री बारा वाजता गुरुद्धरात जाऊन दर्शन घेणार आहेत.
प्रदेश काँग्रेस कमिटीसह राज्यातील सर्वच काँग्रेस नेते या यात्रेची जय्यत तयारी करीत आहेत. नांदेड जिल्ह्यात काँग्रेसचा प्रभाव असलेल्या आणि नसलेल्याही भागातील
जिल्हाभरातील सर्व स्तरातील नागरिकांनी या यात्रेत सहभागी व्हावे, असा प्रयत्न करण्यात येत आहे. काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा तेलंगणातून महाराष्ट्रात आगमन करणार आहे. तेलगंणा आणि महाराष्ट्राच्या सिमेवर असलेल्या देगलूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्यावतीने या यात्रेचे प्रथमस्वागत करण्यात येणार आहे. सोमवारी (दि. ७) सायंकाळी ७.३० वाजता देगलूर येथे यात्रेचे आगमन होईल.
देगलूर येथील नगर परिषदेशेजारी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे यात्रेचे आगमन झाल्यानंतर यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. तेथे स्वागत स्वीकारुन भारत जोडो यात्रा रात्री नऊ वाजता वन्नाळीकडे निघेल. रात्री ११ वाजता यात्रेचे वन्नाळी येथील गुरुद्वारा यादगार साहिबजादे बाबा जोरावरसिंघजी बाबा फतेहसिंघजी वन्नाळी येथे यात्रेचे आगमन झाल्यानंतर श्री गुरुनानक देवजी यांच्या जयंतीनिमित्त गुरुपुरब अरदास केली जाईल.
मंगळवारी (दि. ८) सकाळी ७.३० वाजता वन्नाळी गुरुद्वारा येथून पदयात्रेला पुन्हा प्रारंभ होईल. दुपारी पदयात्रेसाठी वझरगा येथे राखीव वेळ आहे. दुपारी ३ वाजता खतगाव फाटा येथून पदयात्रेला प्रारंभ होईल. सायंकाळी ५.३० वाजता पदयात्रा भोपाळा येथे पोहोचल्यानंतर खा. राहुल गांधी तेथे कॉर्नर मिटिंग घेणार आहेत. बुधवारी (दि. ९) सकाळी ५.४५ वाजता शंकरनगर रामतीर्थ येथून पदयात्रेला प्रारंभ होईल. पदयात्रेच्या मार्गात दुपारचा वेळ नायगाव येथे राखीव असेल.. त्यानंतर दुपारी ३ वाजता नायगाव येथील कुसुम लॉन्स येथून
पदयात्रेला प्रारंभ होईल. सायंकाळी ५.३० वाजता खा. राहुलराहुल गांधी यांची कृष्णूर एमआयडीसी येथे कॉर्नर मिटिंग होईल. गुरुवारी (दि. १०) सकाळी ५.४५ वाजता कापशी गुंफा येथून पदयात्रेला प्रारंभ होईल. दुपारी चंदासिंघ कॉर्नर (नांदेड) येथे पदयात्रा पोहोचल्यानंतर वेळ राखीव आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजता नांदेड शहरातील देगलूर नाका येथून पदयात्रेला प्रारंभ होईल. ही पदयात्रा शहरातून नांदेडच्या नवा मोंढा मैदानावर पोहोचेल. तेथे सायंकाळी ४.३० वाजता खा. राहुल गांधी यांच्या भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवारी (दि. ११) सकाळी ५.४५ वाजता पदयात्रेला दाभड येथून प्रारंभ होणार आहे. पदयात्रा काळात दुपारी पार्डी मक्ता येथील स्वामी फार्म हाऊस येथे राखीव आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजता चोरंबा फाटा येथून पदयात्रेला प्रारंभ होऊन ही पदयात्रा हिंगोली जिल्ह्याकडे प्रयाण करणार आहे. खा. राहुल गांधी यांच्या या भारत जोडो पदयात्रेला केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा या राज्यांत अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात यात्रेचे अभूतपूर्व आणि ऐतिहासिक असे स्वागत करण्याच्या दृष्टीने प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने जय्यत तयारी सुरु आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री नसीम खान, प्रदेशप्रवक्ते अतुल लोंढे, सचिन सावंत, राजू वाघमारे यांच्यासह सर्व ज्येष्ठ नेते नांदेडमध्ये तळ ठोकून आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here