Home मुंबई विनायक मेटे यांचा अपघात की घातपात..? सर्वांच्या मनात प्रश्न मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

विनायक मेटे यांचा अपघात की घातपात..? सर्वांच्या मनात प्रश्न मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

61
0

आशाताई बच्छाव

IMG-20220814-WA0067.jpg

विनायक मेटे यांचा अपघात की घातपात..? सर्वांच्या मनात प्रश्न मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

मुंबई (अंकुश पवार, जिल्हा प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्यूज चॅनेल अँड पेपर)

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं आज अपघाती निधन झालं. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मात्र, हा अपघात होता की घातपात? असा संशय आता व्यक्त होऊ लागला आहे.
एकीकडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चालकाच्या डुलकीमुळे हा अपघात झाला असण्याचा संशय व्यक्त केला असताना दुसरीकडे बराच वेळ रुग्णवाहिका न पोहोचणं, आजूबाजूच्या कुणीही मदत न करणं या गोष्टींवरून या घटनेमध्ये घातपाताचा संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे.
मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी विनायक मेटे बीडहून मुंबईच्या दिशेने येत होते. रविवारी पहाटे ५ च्या सुमारास महामार्गावरील माडप बोगद्याजवळ त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. विनायक मेटे यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत घोषित करण्यात आलं. मात्र, यावरून आता संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे.
मराठा क्रांती ठोक मोर्चाचे नेते आणि मराठा समन्वयक बाळासाहेब खैरे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या घडामोडींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “आम्ही माहिती घेतली त्यानुसार अपघात झाला तेव्हा २ तास तिथे रुग्णवाहिका आली नाही. कोणतीही सुविधा मिळाली नाही. आजूबाजूला मदतीसाठी कुणी थांबलं नाही. येण्या-जाण्यातही बराच वेळ गेला. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. हा अपघात होता की घातपात होता? याची आम्हाला शंका आहे. हे सरकारनं तात्काळ जाहीर करावं. मराठा आरक्षणासाठी अजून सरकार किती बळी घेणार आहे? हा आमचा सरकारला सवाल आहे”, असं ते म्हणाले.
दरम्यान, विनायक मेटे यांचा चालक एकनाथ कदम यानं दावा केल्याप्रमाणे पहाटे ५ च्या सुमारास अपघात झाल्यानंतर सुमारे तासभर रुग्णवाहिका आलीच नाही. कंट्रोल रुमला फोन केल्यानंतर देखील तिथून तातडीने हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे या अपघात प्रकरणावर संशयाचे ढग जमा होऊ लागले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here