राजेंद्र पाटील राऊत
शासकीय इतमामात जवान डुबुकवाड
यांना साश्रुनयनाने अखेरचा निरोप
• पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी कुटुंबियांचे केले सांत्वन
• “शहीद जवान अमर रहे” च्या घोषणेने पंचक्रोशीतील गावकऱ्यांची श्रद्धांजली
नांदेड (मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) दि. 20 :- कंधार तालुक्यातील बाचोटीचे भुमीपूत्र वीर जवान बालाजी श्रीराम डुबुकवाड यांच्या पार्थिवावर आज बाचोटी येथे साश्रुनयनांनी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जम्मू-काश्मिर येथील कुपवाडा येथे भारत मातेचे रक्षणासाठी वीर जवान नायक बालाजी यांना कर्तव्य बजावतांना दिनांक 18 डिसेंबर रोजी वीर मरण आले. भारतीय सैन्यदलातील 101 INF BN (TA) मराठा LI दलातील लान्सनायक म्हणून ते कर्तव्यावर होते.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी बाचोटी येथे वीर जवान बालाजी यांना पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार श्यामसुंदर शिंदे, माजी खासदार डॉ. केशवराव धोंडगे, माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, माजी आमदार रोहिदास चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी शरद मंडलीक आदींनी यावेळी वीर जवान बालाजी यांना श्रद्धांजली अर्पण केली. पंचक्रोशीतील नागरीक व युवकांची यावेळी उपस्थिती होती.