Home नांदेड जीवाची पर्वा न करता बहिणीने वाचविले भावाचे प्राण*

जीवाची पर्वा न करता बहिणीने वाचविले भावाचे प्राण*

312
0

राजेंद्र पाटील राऊत

जीवाची पर्वा न करता बहिणीने वाचविले भावाचे प्राण*

नांदेड-(मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) बिलोली तालुक्यातील थडीसावळी गावातील आनंद येडलेवार यांची मुलगी कुमारी लक्ष्मी हिने तिचा लहान भाऊ आदित्यला विजेच्या धक्क्यातून वाचविले आहे. झाले असे की, शेजारच्या घरावरील पत्रे उडून नयेत म्हणून त्यावरून लोखंडाची तार आडवी टाकून ती खाली दगडाला गुंडाळून ठेवलेली होती. घराच्या आतमध्ये लोखंडी राँडला अडकवलेल्या पंख्याच्या वायरला उंदरांनी कुरतडले होते. त्यामुळे त्यातला विद्युत प्रवाह संपूर्ण पत्र्यांना व त्या लोखंडी तारेत उतरला होता. लक्ष्मीचा लहान भाऊ आदित्य हा त्या तारेजवळून घरापुढील अंगणात जाताना त्याचा तोल गेल्याने पटकन त्याने तारेला हात धरला. त्यामुळे त्याच्या शरीरात विद्युत प्रवाह शिरल्याने तो थरथरत किंचाळू लागला. सदर प्रकार जवळच खेळत असलेल्या लक्ष्मीच्या लक्षात आला. क्षणाचाही विलंब न लावता तिने ओरडत धावत जाऊन आदित्यला काठीने सोडवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. पण आदित्यची आवळलेली घट्ट मूठ काही केल्या सुटत नव्हती अन् लोखंडाची तार काही काठीने तुटत नव्हती. शेवटी लक्ष्मीने आपल्या जीवाची पर्वा न करता चिमुकल्या आदित्यची मूठ आपल्याच हाताने कशीबशी सोडवली . अन् त्याची त्यातून सुटका केली. पण यात मात्र ती स्वतः तारेला चिटकून बसली. अशाही अवस्थेत ती जोरजोरात ओरडत , किंचाळत होती. तिचा आवाज ऐकून तिचे काका धोंडीबा येडलेवार यांनी धावत येऊन काठीने तिची सुटका केली. पण तोवर मात्र ती बेशुद्ध पडली होती. तिचे दोन्ही हात विजेच्या स्पर्शाने भाजले होते. तोंडाला तिच्या फेस आला होता. अशाही अवस्थेत तिच्या काकाने ताबडतोब तिला दवाखान्यात नेले . डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर ती शुद्धीवर आली. लक्ष्मीला शुद्ध आल्यानंतर प्रथम तिने आपला लहान भाऊ आदित्यची चौकशी केली. व दवाखान्यातूनच त्याच्याशी फोनवरून संवाद साधला . तो बरा असल्याचे ऐकून मात्र लक्ष्मीच्या आनंदाला पारावार राहिले नाही. अशा संकटसमयी प्रसंगावधान राखून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या लहान भावाचा जीव वाचवल्या बद्दल थडीसावळी ग्रामपंचायतीचे सरपंच शिवचंदन आनपलवार व सदस्य मंडळींनी लक्ष्मीचे स्वागत करून अभिनंदन केले.
सध्या लक्ष्मी खतगावच्या मंजुळाबाई हायस्कूल येथील शाळेत इयत्ता सातवी मध्ये शिकत आहे. ती अभ्यासात हुशार व खेळांमध्ये तरबेज आहे. तिच्या या अनन्यसाधारण धाडस आणि शौर्याबद्दल शाळेतून व थडीसावळी गावच्या पंचक्रोशीतून तिचे कौतुक होत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here