राजेंद्र पाटील राऊत
नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने पानेदोन लाखाच्या ऐवजांसह घेतले दोन चोरट्यांना ताब्यात
नांदेड / राजेश भांगे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क
स्थानिक गुन्हा शाखेने पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या नेतृत्वात दोन गुन्हेगारांना पकडून भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांनी केलेल्या पाच चोऱ्या उघडकीस आणल्या आहेत तर सोबतच १ लाख ६२ हजार ८०० रुपयांचा चोरी गेलेला ऐवज जप्त केला आहे .
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या सक्षम नेतृत्वात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार सखाराम नवघरे, पद्मसिंह कांबळे , बालाजी तेलंग , गणेश धुमाळ , विलास कदम , विठ्ठल शेळके आणि शंकर केंद्रे यांनी लोकमित्रनगर नांदेड भागात दोन आरोपींना पकडले. त्यांची नावे शैलेश उर्फ खन्या नवनाथ सावतं रा.तळणी ता.जि.नांदेड आणि आकाश बळीराम आळणे रा.लोकमित्रनगर नांदेड यांना ताब्यात घेतले.
तर यावेळी यांच्यासोबत आणखी एक तिसरा चोरटा राजू कांबळे रा.नवजीवननगर नांदेड हा पण होता असे सांगितले. पकडलेल्या चोरट्यांकडून भाग्यनगर पोलीस ठाण्यात सन २०२१मध्ये दाखल झालेले गुन्हे क्रमांक ७५,९४,१३०,१६३ आणि ३०४ असे पाच गुन्हे उघडकीस आणले. या चोरट्यांकडून १६३ गुन्ह्याचा ऐवज वगळता इतर गुन्ह्यातील सोन्याचे रिंग, सोन्याच्या बांगड्या, मनीमंगळसुत्र, कानातील सोन्याचे वेल, सोन्याचे मनी, रोख रक्कम चांदीच्या दोन समई आणि १० ऍनरॉईड मोबाईल असा एकूण १ लाख ६२ हजार ८०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे . गुन्हा क्रमांक १६३ चा ऐवज राजू कांबळे या चोरट्याकडे आहे असे पकडलेले चोरटे सावंत आणि आळणे सांगतात . स्थानिक गुन्हा शाखेने पकडलेले दोन चोरटे आणि जप्त केलेला मुद्देमाल पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केला आहे.
तर या कामगिरी बद्दल पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे कौतुक केले आहे.