Home Breaking News शेतकऱ्यांना मोठा दिलासा,पिक विमा भरण्यासाठी 8 दिवसांची मुदतवाढ

शेतकऱ्यांना मोठा दिलासा,पिक विमा भरण्यासाठी 8 दिवसांची मुदतवाढ

128
0

शेतकऱ्यांना मोठा दिलासा,पिक विमा भरण्यासाठी 8 दिवसांची मुदतवाढ
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुंबई,दि 16 जुलै 2021 : प्रधानमंत्री पिक विमा योजना खरिप हंगाम 2021 करिता अर्ज करण्यासाठी दिनांक 23 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होता यावे यासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवून देण्याबाबत राज्य शासनाने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता.त्यानुसार योजनेत सहभागासाठी 23 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेतर्गंत नांदेड जिल्ह्यासाठी इफको टोकीयो कंपनीची नियुक्ती केली आहे.या योजनेंतर्गत सन 2021-22 मध्ये खरीप हंगामासाठी पिक विमा प्रस्ताव स्विकारणे सुरु झाले आहे. पिक विमा भरण्याची अंतिम मुदत आता शुक्रवार 23 जुलै पर्यंत वाढविली आहे. पिक विमा योजनेत ज्या शेतकऱ्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी तात्काळ पिक विम्याची नोंदणी करावी.

यापूर्वी पिक विमा भरण्याचा अंतिम मुदत 15 जुलै दिली होती. तथापि महाराष्ट्र शासनाने भारत सरकारच्या कृषि मंत्रालयाला एवढ्या अल्पमुदतीत शेतकऱ्यांना पिक विमा काढणे कठीन असल्याचे निदर्शनास आणून यात मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. कोविड-19 ची परिस्थिती आणि शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन ही मुदतवाढ करीत असल्याचे भारत सरकारच्या कृषि मंत्रालयाचे सहाय्यक आयुक्त सुनिलकुमार यांनी आदेशात म्हटले आहे.

दोन वर्षापासून पिक विमा भरुन, नुकसान भरपाई रक्कम मिळाली नसल्याने तसेच दिड वर्षापासून कोविडचा सामना करावा लागत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ असतो. सिंचनाची मोठी साधनेही नाहीत. त्यामुळे खरीप हंगामात सोयाबीन,कापूस,उडीद,तूर या नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा भर असतो.अनेकदा पावसाने ओढ दिल्यानंतर पिके वाया जातात. तर, मागच्या वर्षी पिके निघण्याच्या वेळी अतिवृष्टीमुळे खरीप पूर्ण हातचे गेले त्यामुळे राज्यात यावर्षी पिक वीमा भरण्याला शेतकऱ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही.बहुतांश शेतकरी विमा भरुन पिक वीमा काही मिळत नाही म्हणून पिक वीम्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र पहावयास मिळले आहे.

दोन वर्षांत शेतकऱ्यांनी विमा संरक्षणासाठी भरलेल्या रकमा आणि राज्य व केंद्र सरकारने भरलेल्या आपल्या हिश्शांच्या रकमांतून पीक विमा कंपनीची तिजोरी भरत असली तरी शेतकऱ्यांचे हात रिकामेच राहत आहेत. परिणामी म्हणूनच राज्यात यंदा पीक विमा संरक्षणाबाबत शेतकऱ्यांचा अनुत्साह दिसून येत आहे.

शिवाय पिक विमा भरताना विमा कंपनीचे सर्व्हर आणि इंटरनेट अनेकवेळा लोड घेत असल्याने व वारंवार लाईट जात असल्याने ग्रामपंचायतीच्या आपले सरकार सेवा केंद्र चालक, प्रायव्हेट ग्राहक सेवा केंद्र चालकांना पीक विमा भरण्यात अनेक अडचणी येत होत्या.त्या पार्श्वभूमीवर पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी,अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. ही मागणी अखेर मान्य करत 8 दिवसांची 23 जुलै पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.ही मुदतवाढ दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here